बीड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वती

बीड : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी योगाभ्यासाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित सामूहिक योग व प्रात्यक्षिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, केवळ योग दिनानिमित्त एक दिवस योग करण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे. योगाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही जपले जाते. विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी योगाचा अवलंब करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असा संदेश त्यांनी दिला. रविवारी सकाळी 6.30 वाजता झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित सामूहिक योग उपक्रमात विविध शासकीय विभागांचे कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, योग प्रशिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके केली. यावेळी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगण्यात आले की, संयुक्त राष्ट्र महासभेने 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला असून तेव्हापासून जगभर हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. योगाचे महत्त्व तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने विशेष परिश्रम घेतले. सहभागी नागरिकांनी योगाचे महत्त्व पटवून देणार्या या उपक्रमाचे स्वागत केले.

COMMENTS