मुंबई : जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या पायी प्रवासासाठी काही रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून राज्यातील राजकारण तापले असतान

मुंबई : जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या पायी प्रवासासाठी काही रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून राज्यातील राजकारण तापले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी या विषयावर प्रथमच आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. समाजांमध्ये तेढ निर्माण करून किंवा प्रत्येक विषयाचे राजकारण करून जनतेचा पाठिंबा मिळत नाही, असे सांगत त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेवर अप्रत्यक्ष टीका केली.
मुंबईतील कोस्टल रोड (किनारी मार्ग) प्रकल्पाच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही राजकीय फायद्यासाठी दोन समाजांना आमनेसामने उभे करणे योग्य नाही. प्रत्येक समाजाच्या परंपरा आणि धार्मिक श्रद्धांचा आदर राखला गेला पाहिजे. त्याचबरोबर त्या परंपरांमुळे इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा नेत्याचे नाव न घेता टीका करताना सांगितले की, केवळ चर्चेत राहण्यासाठी वाद निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. अशा प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसून समाजात सौहार्द टिकवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जैन धर्मगुरू आणि साध्वी अनवाणी पायी प्रवास करतात. उन्हाळ्यात गरम डांबरी रस्त्यांमुळे त्यांना त्रास होऊ नये, या उद्देशाने काही ठिकाणी पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे जैन समाजातील सदस्यांचे म्हणणे आहे. घाटकोपर, दादर आणि दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये अशा पट्ट्यांचे चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या विषयावर वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी या पट्ट्यांना विरोध दर्शवला आहे. दादरनंतर गिरगाव परिसरातही आंदोलन करण्यात आले. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग फासून निषेध व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
राज्यात या विषयावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजांमधील परस्पर आदर आणि सलोखा जपण्याचे आवाहन केले असून, धार्मिक परंपरा आणि सार्वजनिक हित यामध्ये संतुलन राखण्याची गरज अधोरेखित केली आहे.

COMMENTS