मुंबई : मुंबईतील घाटकोपर, दादर आणि चर्नी रोड परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)

मुंबई : मुंबईतील घाटकोपर, दादर आणि चर्नी रोड परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि जैन समाजातील धर्मगुरूंमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे धार्मिक भावना, सार्वजनिक जागांचा वापर आणि कायद्याचे पालन या मुद्द्यांवर मुंबईत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजातील काही घटकांकडून रस्त्यांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे काढण्यात आल्याचे समोर आले होते. दादर परिसरातील मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेरही अशाच प्रकारचे पट्टे दिसून आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तीव्र विरोध दर्शवला. वाद वाढत असल्याचे लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने (BMC) मध्यस्थी करत संबंधित पट्टे हटवले. सार्वजनिक रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच सार्वजनिक मालमत्तेचा वापर नियमांच्या चौकटीतच झाला पाहिजे, असेही सांगण्यात आले.
जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी “पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे” असे सांगत मनसेच्या आंदोलनावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर वादाला आणखी धार आली. यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत जैन समाजातील काही घटकांवर सार्वजनिक ठिकाणी धार्मिक आग्रह लादण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. “कोणत्याही समाजाला किंवा समूहाला सार्वजनिक रस्त्यांचा स्वतःच्या धार्मिक प्रथांसाठी वापर करण्याचा अधिकार नाही,” असे ते म्हणाले.
देशपांडे यांनी कायदा सर्वांसाठी समान असल्याचे नमूद करत, सार्वजनिक मालमत्तेवरील नियमबाह्य प्रकारांना मनसेकडून विरोध सुरूच राहील, असे स्पष्ट केले. भविष्यात अशा घटना घडल्यास मनसे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जाऊन विरोध करतील, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणामुळे मुंबईतील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

COMMENTS