श्रीरामपूर : मानवी मन संस्कारातून घडते, प्रत्येक घरात 'श्यामची आई' हवी. आजच्या धकाधकीच्या युगात पुस्तक संस्कार महत्त्वाचे असून डॉ. बाबूराव उपाध्य

श्रीरामपूर : मानवी मन संस्कारातून घडते, प्रत्येक घरात ‘श्यामची आई’ हवी. आजच्या धकाधकीच्या युगात पुस्तक संस्कार महत्त्वाचे असून डॉ. बाबूराव उपाध्ये लिखित ‘ह्या मन मंदिरातून’ हा कवितासंग्रह म्हणजे एक ज्ञानदीप आहे, असे मत सीआरपीएफचे (CRPF) पीआय अर्थात पोलीस सब-इन्स्पेक्टर मेजर नंदकुमार संतराम सेंदोरे यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील इंदिरा नगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबूराव उपाध्ये यांच्या ‘ह्या मन मंदिरातून’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्यात पीएसआय मेजर नंदकुमार सेंदोरे बोलत होते. प्रारंभी डॉ. उपाध्ये यांनी कवितासंग्रहाचा परिचय करून दिला. यावेळी संजय कारभारी उपाध्ये यांनी मेजर नंदकुमार सेंदोरे यांचा सत्कार केला, तर रयत शिक्षण संस्थेच्या डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातून कार्यालय अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले कचरू जोधवेकर यांचा सत्कार डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी केला.
मेजर नंदकुमार सेंदोरे यांनी कवितासंग्रहातील काही संस्कारकवितांचे वाचन करून त्यातील मूल्ये कौटुंबिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनासाठी कशी आदर्श आहेत, हे सांगितले. चांगले मन चांगले विचार करते आणि चांगली कृती करते, असेही ते म्हणाले. श्रीरामपुरात डॉ. उपाध्ये यांनी जी वाचन संस्कृती चळवळ सुरू ठेवली आहे, या चळवळीस पाठबळ मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सौ. कुंदा विलास तुळे, प्रा. सौ. पल्लवी सेंदोरे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. श्रद्धा चेतन तुळे, कृष्णा सेंदोरे, कार्तिक जोधवेकर, श्रीमती सुमनबाई मांधरे, श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये, सौ. जयश्री जोधवेकर, आराध्या सेंदोरे, श्रीराम सेंदोरे, धनश्री सेंदोरे आदींनी कवितासंग्रहाचे कौतुक केले. प्रा. सौ. पल्लवी सेंदोरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

COMMENTS