वडवणी : महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडवणी येथील अंशतः अनुदानित शिक्षक तथा जनगणना प्रगणक श्री. विलास समर्थ हे जनगणनेचे राष्

वडवणी : महाराणी ताराबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडवणी येथील अंशतः अनुदानित शिक्षक तथा जनगणना प्रगणक श्री. विलास समर्थ हे जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जनगणना अधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. समर्थ हे बुधवारी (दि. ३ जून २०२६) जनगणनेच्या कामासाठी बीडहून जात असताना ढेकणमोहा परिसरात रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता खराब झाला होता. त्याचवेळी समोरून येणार्या कंटेनरमुळे त्यांची मोटारसायकल घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर बीड येथील वेलनेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अंशतः अनुदानित शिक्षक असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय संरक्षण अथवा आरोग्य विमा उपलब्ध नसल्याने उपचाराचा खर्च पेलणे कठीण होत असल्याचे सहकार्यांनी सांगितले. सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असतानाही शिक्षक जनगणनेसारखे राष्ट्रीय महत्त्वाचे काम पार पाडत आहेत. भर उन्हात पायपीट, वाहतुकीचा धोका आणि कामाचा ताण यामुळे शिक्षकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. श्री. समर्थ यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांच्या उपचारासाठी शासनामार्फत आर्थिक मदत मिळावी, यासाठी नगरपंचायत वडवणीचे मुख्याधिकारी तथा जनगणना चार्ज अधिकारी आणि तहसीलदार वडवणी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
हे निवेदन जनगणना सुपरवायझर उपप्राचार्य श्री. घायतीडक, सुपरवायझर श्री. सुनील कुलकर्णी तसेच प्रगणक प्रा. सी. व्ही. मुंडे, इतापुरे, कुरकुटे, शिंदे, प्रा. डाके, चव्हाण, उजगरे, साळवे आदी सहकार्यांनी सादर केले असून श्री. विलास समर्थ यांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS