नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा परिसरातील एका ७० वर्षीय शेतकऱ्याने आणि त्यांच्या मुलीने न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इ
नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा परिसरातील एका ७० वर्षीय शेतकऱ्याने आणि त्यांच्या मुलीने न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, हदगाव यांना निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, मौजे उमरी येथील गट क्रमांक २८६ मधील शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा सुमारे ७० वर्षांपासून ताबा आहे. मात्र, कल्पा पावर कंपनीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने अंदाजे पाच ते आठ हजार ब्रास मुरूमाचे उत्खनन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच कंपनीकडून शेतजमिनीवर अतिक्रमण करून ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदार मिराबाई शंकर जाधव आणि वसंत उमला राठोड यांनी संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, मात्र कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम वाहून नेण्यात आला असून स्वतःला व मुलीला धमकावून शेतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंडळ अधिकाऱ्यांनी योग्य पंचनामा न केल्यामुळे न्याय मिळत नसून, कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

COMMENTS