सोलापूर : नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लाग

सोलापूर : नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात राज्यातील शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारने महामार्गाच्या आराखड्यात काही बदल करून सुधारित अधिसूचना जाहीर केली असली, तरी नव्या रेखांकनामुळे अनेक शेतजमिनी बाधित होणार असल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण येथे रविवारी सकाळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.
सुधारित आराखड्यानुसार माढा तालुक्यातील मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवड, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे, वडाचीवाडी, सोळकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण आणि तुळशी या गावांचा महामार्ग प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती जमीन संपादित होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
“शेती वाचवा, गाव वाचवा” तसेच “जमीन आमच्या हक्काची” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. माढा आणि माळशिरस तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. “जमीन गेली तर जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. महामार्गामुळे विकास होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी शेती आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

COMMENTS