मुंबई : मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी

मुंबई : मानसिक आरोग्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबई येथे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
मानसिक आजारांविषयी समाजात असलेली भीती, संकोच आणि गैरसमज दूर करण्यासाठी डॉ. नाडकर्णी यांनी सातत्याने काम केले. मानसिक आरोग्य हा लपवण्याचा विषय नसून इतर शारीरिक आजारांप्रमाणेच त्याकडे पाहिले पाहिजे, हा विचार त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. सोप्या आणि सहज भाषेत लेखन, व्याख्याने, समुपदेशन, नाटके आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती केली. वैद्यकीय क्षेत्रासोबतच साहित्य आणि रंगभूमीवरही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना राज्य शासनाचा सन्मान मिळाला होता. ‘रंग माझा वेगळा’, ‘असेच आम्ही सारे’ आणि ‘आम्ही जगतो बेफाम’ यांसारख्या नाटकांमधून त्यांनी मानवी मनाचे विविध पैलू उलगडले. ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळाला होता, तर ‘गेट वेल सून’ या नाटकाच्या संकल्पनेलाही मोठी दाद मिळाली होती. ‘एका मानसोपचार तज्ज्ञाची दिनचर्या’, ‘माझे औषधपत्र’, ‘मनोगती’, ‘मुक्तिपत्रे’, ‘स्वभाव-विभाव’ आणि ‘हेही दिवस जातील’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी मानवी भावविश्वाचा वेध घेतला. डॉ. नाडकर्णी यांनी 1980 मध्ये वैद्यकीय पदवी आणि 1984 मध्ये मनोविकारशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच मानसिक आरोग्याबाबत समाजप्रबोधनाची गरज त्यांनी ओळखली. त्यातून 23 मार्च 1990 रोजी ठाण्यात मानसिक आरोग्यविषयक संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत उपचारांसोबतच व्यक्तिमत्त्व विकास, समुपदेशन, कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि मानसिक स्वास्थ्यासाठी विविध उपक्रम राबवले गेले. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला आणि संवाद यांचाही उपचार प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यात आला. ‘शहाण्यांचा मानसोपचार तज्ज्ञ’ अशी ओळख मिळवलेल्या डॉ. नाडकर्णी यांनी वैद्यकीय सेवेला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS