Homeताज्या बातम्याबीड

उष्माघातापासून सावध राहा ; नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी -जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंध आणि आपत्ती व्यवस्थापन मोहिमेला गती दिली असून

मी म्हणेल तोच कायदा; तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत यश

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने उष्माघात प्रतिबंध आणि आपत्ती व्यवस्थापन मोहिमेला गती दिली असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. जिल्ह्यात तापमानाने चाळिशी ओलांडल्याने उष्माघाताचा धोका वाढला असून दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी संयुक्तपणे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने आरोग्य, महसूल, ग्रामविकास, शिक्षण, कृषी, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. बीड जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र सुमारे 10 हजार 693 चौ.कि.मी. असून जिल्ह्यात 11 तालुके आणि 1403 गावे आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या 28 लाखांहून अधिक आहे. शेती, बांधकाम, रस्ते कामे आणि इतर मैदानी कामांमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांवर उष्णतेचा परिणाम अधिक होत असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची सोय आणि जनजागृती साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. विविध विभागांमध्ये समन्वय राखून तातडीची प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार कक्ष, शीत कक्ष आणि आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, ग्रामसेवक, तलाठी, आशा कार्यकर्त्या, शिक्षक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गावपातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. वृद्ध नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला आणि मैदानी कामगारांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होणे, जास्त घाम येणे, अशक्तपणा, डोके गरगरणे, उलट्या, उच्च तापमान, त्वचा कोरडी पडणे आणि शुद्ध हरपणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत रुग्णाला सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवून त्वरित पाणी द्यावे आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात उपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात स्वतंत्र शीत कक्ष तयार करण्यात आले असून डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामस्तरावर 620 ग्रामसेवक, 512 तलाठी आणि 517 आरोग्य कर्मचार्‍यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई, आरोग्य सेवा, जनजागृती आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? तहान लागली नसली तरी नियमित पाणी प्यावे, ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांचा वापर करावा, हलके आणि सुती कपडे परिधान करावेत, डोक्यावर टोपी, छत्री किंवा ओले कापड वापरावे, दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावेख, प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, उन्हात काम करताना मध्ये मध्ये विश्रांती घ्यावी, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा, गरोदर महिला, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, जनावरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी द्यावे काय टाळावे? उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत, दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये टाळावीत, शिळे आणि उच्च प्रथिनयुक्त अन्न खाऊ नये, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, गडद, जाड आणि घट्ट कपडे वापरणे टाळावे, जास्त तापमानात शारीरिक श्रमाची कामे टाळावीत

COMMENTS