Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘दुहेरी’ ठरावामुळे चर्चेला उधाण; बँक निवडणुकीत प्रणिता देवरे यांची दमदार एन्ट्री

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून ‘दुहेरी’ ठरावामुळे सहकार क्षेत्रात चर्च

कल्याणकरांविरोधातील कारस्थानांचा पर्दाफाश होणार?शिवसेना नेतृत्वाने निष्ठावंतांना न्याय द्यावा; फंदफितुरी करणार्‍यांवर कारवाईची मागणी
नांदेड विधान परिषद मतदारसंघासाठी हालचालींना वेग; बदललेल्या राजकीय समीकरणांत रंगणार नवी लढत
निष्ठावंत अनिलदादा जगताप यांना विधान परिषदेची संधी द्यावी – सुनिल सुरवसे
nanded-district-bank-election-pratap-patil-chikhalikar-daughter-pranita- devre-voters-list-double-entry-row | प्रणिता देवरे यांचे नाव दोन  तालुक्यांमधून दाखल! नांदेड जिल्हा बँकेची प्रारुप ...

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून ‘दुहेरी’ ठरावामुळे सहकार क्षेत्रात चर्चेचे वारे जोरात वाहू लागले आहेत. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी बँक राजकारणात प्रवेश करण्याची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शिवजयंतीच्या मुहूर्तावर सहकार क्षेत्रात पहिले पाऊल टाकल्यानंतर आता त्यांनी थेट जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. कंधार आणि लोहा या दोन तालुक्यांतील सेवा सहकारी संस्थांकडून त्यांच्या नावाचे ठराव मतदार यादीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीला बळ मिळाले असून राजकीय समीकरणे नव्याने आकार घेऊ लागली आहेत. कंधार तालुक्यातील चिखली येथील सेवा सहकारी सोसायटी तसेच लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील सेवा सहकारी सोसायटीने प्रणिता देवरे यांच्या नावाचा ठराव मंजूर करून पुढे पाठविला आहे. या ‘दुहेरी’ ठरावामुळे ‘अ’ मतदारसंघातून कोणत्याही एका तालुक्यातून निवडणूक लढविण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे योग्य वेळी राजकीय गणित मांडत अंतिम निर्णय घेण्याची रणनीती आखण्यात आली असल्याची चर्चा आहे. या घडामोडीमुळे चिखलीकर परिवारातील तिसर्‍या सदस्याची जिल्हा बँकेच्या राजकारणात एंट्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच या परिवाराचा सहकार क्षेत्रावर प्रभाव राहिलेला असताना आता नव्या पिढीच्या रूपाने प्रणिता देवरे – चिखलीकर यांचे नाव पुढे येत असल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, बँकिंग कायद्यातील नव्या तरतुदींमुळे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि त्यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांना संचालकपदासाठी पुढील निवडणूक लढविता येणार नाही. संचालक म्हणून सलग दहा वर्षांची मुदत पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यावर मर्यादा लागू झाल्या आहेत. परिणामी, त्यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली असून त्यासाठी प्रणिता देवरे यांचे नाव आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात पदार्पण केलेल्या प्रणिता देवरे यांनी अल्पावधीत संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली आहे. महिला नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण होत असताना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांची एन्ट्री ही केवळ औपचारिक नसून रणनीतिक मानली जात आहे. एकूणच, ‘दुहेरी’ ठरावाच्या पार्श्वभूमीवर नांदेडच्या सहकार राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रणिता देवरे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे पारंपरिक गटांमध्ये हालचाली वाढल्या असून, या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS