Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटच्या जंगलात ’स्लो पॉयझन’; रसायनांच्या इंजेक्शनने ’धवाडा’ वृक्षांची कत्तल! वनअधिकारी आणि परप्रांतीय व्यापार्‍यांचे साटेलोटे? शिवसेनेसह निसर्गप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

किनवट : निसर्गसंपदेने नटलेल्या किनवट वनपरिक्षेत्रात सध्या एक अत्यंत भयानक प्रकार उघडकीस आला आहे. मौल्यवान औषधी गुणधर्म असलेल्या ’ धावंडा’ ज

कर्नाटकात दहावीच्या निकालपत्रातून ‘मराठी’ गायब?सीमाभागात संताप; कर्नाटक सरकारवर टीकेची झोड
तरोडा बुद्रुकमध्ये वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा; संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयाला कुलूप ठोकत केला तीव्र निषेध
६० वर्षांपासून कसत असलेली जमीन हडपली; मधुकर बाटकरांचे ३ दिवसांपासून आमरण उपोषण!। लोकमंथन News२४

किनवट : निसर्गसंपदेने नटलेल्या किनवट वनपरिक्षेत्रात सध्या एक अत्यंत भयानक प्रकार उघडकीस आला आहे. मौल्यवान औषधी गुणधर्म असलेल्या ’ धावंडा’ जातीच्या झाडांना रसायनांची विषारी इंजेक्शन देऊन कृत्रिमरीत्या डिंक काढण्याचा गोरखधंदा तेजीत सुरू आहे. या प्रकारामुळे हजारो झाडे वाळून मृत पावत असून, यामागे परप्रांतीय व्यापारी आणि स्थानिक वनविभागाच्या कर्मचार्‍यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
नैसर्गिकरीत्या धावंडा झाडापासून 15 दिवस ते 1 महिन्यात साधारण 100 ते 200 ग्रॅम डिंक मिळतो. मात्र, अधिक नफ्याच्या हव्यासापोटी या झाडांना रासायनिक इंजेक्शन दिले जात आहे. या ’स्लो पॉयझन’मुळे अवघ्या 3 ते 4 दिवसांत अर्धा ते एक किलो डिंक बाहेर येतो. मात्र, या प्रक्रियेमुळे झाडाचे आयुष्य संपत असून ती कायमची वाळून जात आहेत. किनवट परिसरातील भीमपूर, पिताबंरवाडी, घोघरवाडी, अंबाडी, शिवनराखेडा यांसारख्या अनेक जंगल क्षेत्रातील भागांत हा प्रकार सर्रास सुरू आहे. मध्य प्रदेशातील व्यापारी स्थानिक दलालांमार्फत हे रॅकेट चालवत असल्याचे समजते. विशेष म्हणजे, जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या वनहक्क समिति, वनअधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमतानेच हा प्रकार गेल्या 3-4 वर्षांपासून सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. झाडांच्या बुंध्याला कुर्‍हाडीने घाव घालून किंवा खिळे ठोकून त्यातून विषारी औषध टोचले जात असून, यामुळे केवळ निसर्गाचेच नव्हे तर या विषारी डिंकामुळे मानवी आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी तालुकाप्रमुख राम पाटील आणि तालुका संघटक विनोदराव एड्रलवार यांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले आहे. या प्रकरणाची (भारतीय वन सेवा) दर्जाच्या अधिकार्‍यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी अधिकार्‍यांना निलंबित करावे आणि संबंधित व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत या प्रकरणावर ठोस कारवाई न झाल्यास, निसर्गप्रेमी जनता आणि शिवसेनेतर्फे रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती वनमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य वनसंरक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता प्रशासन या ’वृक्षहत्या’ थांबवण्यासाठी काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS