मुंबई : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदावर अखेर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्री

मुंबई : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदावर अखेर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. माजी अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते.
या निवडीमागे मागील वर्षातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी लक्षात घेण्यासारखी आहे. त्या वेळी अध्यक्षपदासाठी मोहोळ यांनी अजित पवार यांच्याविरोधात भूमिका घेण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, शेवटच्या क्षणी दोघांमध्ये समन्वय साधला गेला आणि अजित पवार अध्यक्षपदी, तर मुरलीधर मोहोळ उपाध्यक्षपदी निवडले गेले होते. आता पवार यांच्या निधनानंतर मोहोळ यांच्या खांद्यावर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. त्यांनी नुकताच खो-खो संघटनेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात प्रवेश केल्याने त्यांच्या नावाची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

COMMENTS