Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिजामाता नर्सिंग कॉलेजमध्ये ‘लॅम्प लायटिंग’ व स्नेहसंमेलन थाटात संपन्न

माजलगाव : माजलगाव येथील जिजामाता नर्सिंग कॉलेजमध्ये नुकताच ‘लॅम्प लायटिंग’ सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वाताव

बुलडाण्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवेला नवे बळ; कमांडिंग मेजर जनरलच्या हस्ते दवाखान्याचे भूमिपूजन!
अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
नांदेड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आयुष्यमान आरोग्य शिबिर; 90 कैद्यांची तपासणी

माजलगाव : माजलगाव येथील जिजामाता नर्सिंग कॉलेजमध्ये नुकताच ‘लॅम्प लायटिंग’ सोहळा आणि वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. ज्ञान, सेवा, समर्पण आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाली. माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई प्रकाश सोळंके, एस.आर.टी.आर. मेडिकल कॉलेज अंबाजोगाईचे डीन डॉ. शंकर धपाटे, टी.एन.ए.आय. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ पापालाल राठोड, लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन जयसिंग (भैय्या) सोळंके, प्राचार्य एन. विनोथ कुमार, सिंदफणा पब्लिक स्कूलचे प्राचार्य अन्वर शेख, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.लॅम्प लायटिंग सोहळा हा नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या वेळी विद्यार्थ्यांनी हातात दिवा घेऊन सेवा, समर्पण आणि मानवतेची शपथ घेतली. या प्रसंगी बोलताना मंगलाताई सोळंके यांनी सांगितले की, शिक्षणाचा उद्देश केवळ पदवी मिळवणे नसून समाजासाठी एक जबाबदार आणि संवेदनशील व्यक्ती बनणे हा आहे. नर्सिंग क्षेत्रात काम करताना रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यातून कॉलेजचे नाव उज्ज्वल करावे.डॉ. शंकर धपाटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना नर्सिंग क्षेत्रातील जबाबदार्‍या आणि संधी यावर प्रकाश टाकला. तसेच प्राचार्य एन. विनोथ कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजने शैक्षणिक गुणवत्तेत केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले.राजाभाऊ राठोड यांनी विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रातील विविध कोर्सेस, उच्च शिक्षणाच्या संधी आणि करिअर मार्गांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरही नर्सिंग क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. जयसिंग सोळंके यांनी आपल्या भाषणात पोलिओ आणि कुष्ठरोग (लेप्रसी) यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात नर्सेसचे मोठे योगदान असल्याचे अधोरेखित केले आणि त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. लॅम्प लायटिंगच्या गंभीर आणि प्रेरणादायी वातावरणानंतर स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाला उधाण आले. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.लोकनृत्य, आधुनिक नृत्य, नाटिका, गीते अशा विविध कार्यक्रमांनी सभागृह दणाणून गेले. विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्त्या घेऊन ‘नर्सिंग’ हा शब्द साकारला. या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांवर प्रभाव पाडला आणि मान्यवरांनी त्याचे विशेष कौतुक केले. यावेळी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीबाबतही माहिती देण्यात आली. निकालात झालेली वाढ आणि विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला.पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे पालकांनी मनापासून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात आनंद, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.गुणवंतांचा गौरव आणि समारोप कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. उपप्राचार्य प्रवीण कुमार, कार्यालय अधीक्षक वाघ सर, तसेच प्रदीप सर, शिंदे सर, जगताप सर, इरफान पठाण सर, रासवे सर, सीरसट सर, वगरे सर आणि सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मोलाचे योगदान दिले.

COMMENTS