Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फडणवीसांची ती ऑफर…रस्त्यातील नमस्कारासारखी…

सत्यजीत तांबेंचे सूचक भाष्य, राजकीय साक्षरतेवर काम करण्याचे सूतोवाच

अहमदनगर प्रतिनिधी - रस्त्याने जाताना कोणीतरी आपल्याला नमस्कार घालतो...तो अनोळखी असेल तर कोण होता, असा विचार दोन दिवस मनात राहतो. पण ओळखीचा असेल

पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डबलगेम
कर्नाटक सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा – मुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली डॉक्टरेट पदवी

अहमदनगर प्रतिनिधी – रस्त्याने जाताना कोणीतरी आपल्याला नमस्कार घालतो…तो अनोळखी असेल तर कोण होता, असा विचार दोन दिवस मनात राहतो. पण ओळखीचा असेल तर आपल्या का नमस्कार घातला…असा विचार सतत सुरू असतो. त्यामुळे सत्यजीत तांबेंवर आमची नजर आहे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भाष्याकडे आपण रस्त्यावरील नमस्कारासारखे पाहतो, असे सूचक भाष्य प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष व युवा नेते सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी गुरुवारी येथे केले. दरम्यान, लहान मुलांसह युवा पिढीत राजकीय साक्षरता येण्यासाठी येत्या एप्रिल 2023पासून जयहिंद युवा मंचच्या माध्यमातून विशेष मोहीम शाळा-महाविद्यालयांतून सुरू करण्याचे सूतोवाचही तांबे यांनी केले.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा सत्यजीत तांबे यांनी मराठीत ‘सिटीझनविल’ याच नावाने अनुवाद केला आहे. या पुस्तकाबद्दल नगरच्या माध्यम प्रतिनिधींशी तांबे यांनी संवाद साधला. यावेळी काही राजकीय चर्चाही झडल्या. तांबे यांच्या या अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यावेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आणि तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांना उद्देशून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, बाळासाहेब… तुमच्याकडे माझी एक तक्रार आहे.

सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? सत्यजीतला जास्त दिवस बाहेर ठेवू नका. नाहीतर आमची नजर त्यांच्यावर आहे. कारण, चांगली माणसे जमाच करायची असतात, असे त्यांनी भाष्य केल्यावर तेथे जोरदार हशा उसळला होता. मात्र, तेव्हापासून तांबे यांना भाजपने अप्रत्यक्षपणे दिलेल्या या ऑफरची चर्चा राज्यभरात आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना तांबे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली व थेट उत्तर देणे टाळले. अशी विधाने होतच असतात. रस्त्यावरच्या नमस्कारासारखे आपण त्याकडे पाहतो, त्यामुळे त्यावर गांभीर्याने विचार केलेला नाही. माझा जन्म आणि राजकीय प्रवास ज्या विचारांत झाला आहे, तो सोडून काम करणे अवघड होऊ जाईल, याचाही विचार करावा लागणार आहे, असे भाष्य त्यांनी केले. मात्र त्यानंतर बोलताना, काम करणार्‍याला योग्य व्यासपीठ हवेच असते व त्याशिवाय कामाला गतीही देता येत नाही. अर्थात यासाठी मी लगेच भाजपमध्ये जाणार आहे, असेही नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. दरम्यान, तांबे यांनी फडणवीसांची ऑफर ना थेट स्वीकारली वा थेट नाकारली, मात्र त्यांच्या भाष्यातून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत मिळत असल्याचा अंदाज बांधला जात आहे.

राजकीय साक्षरता गरजेची – ‘सिटीझनविल’ या पुस्तकात लोकसहभागातून शहर विकासाचा मुद्दा मांडलेला आहे. नागरिकांनी आपल्या भागाचा विकास कसा असावा, हे सुचवायचे व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने त्याला मान्यता दिली तर संबंधित नागरिकांनीच लोकसहभागातून आपल्या भागात तसा विकास करायचा व या बदल्यात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था त्यांना घरपट्टी व पाणीपट्टीसह अन्य संकलित करात काहीअंशी सूट देते, अशा पद्धतीची ही रचना आहे, असे सांगून तांबे म्हणाले, आपल्याकडेही असे होऊ शकते. पण त्यासाठी जनतेमध्ये जागरूकता गरजेची आहे. त्यामुळे या पुस्तकात मांडलेल्या विचारांच्या आधारेच राज्यभर प्रत्यक्ष काम उभे करणार आहे. आता पुस्तक लिहून थांबायचे नाही, असे ठरवले आहे. आतापर्यंतचे राजकारण आणि या पुस्तकाचे लेखन यानिमित्ताने या क्षेत्रातील बर्‍याच त्रुटी आणि नेमके कोठे काम केले पाहिजे, ते लक्षात आले आहे. त्यामुळे जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आता राजकीय साक्षरता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी नागरिक शास्त्राच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांपासूनच प्रबोधन मोहीम सुरू करणार आहोत. यासाठी राज्यभर दौरे करणार आहोत. या मोहिमेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे व नव्या वर्षात एप्रिलपासून प्रत्यक्षात ही राजकीय साक्षरता मोहीम सुरू करण्याचा विचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दबाव गटांची गरजही व्यक्त –  राज्यभरात बहुतांश शहरांचा विस्तार होत आहे. तेथे पुरेशा नागरी सुविधाही बर्‍याचदा मिळत नाहीत. मात्र, अशा विस्तारीत शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ठिकठिकाणी राजकारण विरहित दबावगट तयार झाले पाहिजे. यासाठी पक्षविरहित तरुणांना जोडले जाण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार होऊ पाहत आहे. त्यामुळे तरुण वर्ग व्यवस्थेवर आणि पर्यायाने राजकारणावर नाराज आहे. मतदानापासून लांब राहून तो नाराजी व्यक्त करतो. पण त्यांच्यातील अशी नाराजी दूर करून त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करावी लागणार आहे व त्यांच्या दबाव गटाच्या माध्यमातून विकासाला चालना देता येऊ शकते. पण सध्याच्या परिस्थितीत कोणताही राजकीय पक्ष हे काम प्रभावीपणे करू शकणार नाही, त्यामुळे राजकारण विरहित ही दबाव गट चळवळ हवीच व यावरही काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS