कर्जत : अहिल्यानगर व राहुरीप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही भविष्यात लक्ष घालून परिवर्तन घडवणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे यांनी केले.

कर्जत : अहिल्यानगर व राहुरीप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही भविष्यात लक्ष घालून परिवर्तन घडवणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे यांनी केले. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात या भागात काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडी येथे आयोजित “गोदा ते नर्मदा” जलयात्रेच्या स्वागतप्रसंगी ते बोलत होते. या जलयात्रेचे कर्जत तालुक्यात भव्य स्वागत करण्यात आले. चापडगाव, कोरेगाव मार्गे कर्जत शहरात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व ढोल-ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर विखे पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
यावेळी दादासाहेब सोनमाळी, काकासाहेब धांडे, अनिल गदादे, सचिन पोटरे, दत्तात्रय नलवडे, कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम धायगुडे, विनोद दळवी, पांडुरंग क्षीरसागर, अभय पाटील, काका ढेरे, सागर लाळगे, अशोक खेडकर, प्रकाश शिंदे, नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, नागरिक, महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी विखे यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाचे दर्शन घेत जलसंवर्धनाचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते या जलयात्रेचा शुभारंभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाबाबत विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना विखे म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप आधी विरोधकांनीच केला होता. आता दुरुस्ती होत असताना तेच नावं वगळली जात असल्याचे सांगणे ही दिशाभूल असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून अर्ज देऊन बदली होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापुरुषांविषयी सुरू असलेल्या वादांवर बोलताना विखे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे महापुरुषांची प्रतिमा कमी होत नाही. सोशल मीडियावरून मुद्दाम वाद निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, “गोदा ते नर्मदा” जलयात्रा ही केवळ धार्मिक उपक्रम नसून जलसंवर्धनासाठीची जनचळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पाणी व्यवस्थापनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS