अहिल्यानगर : धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने तपा

अहिल्यानगर : धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आलेल्या अशोक खरात प्रकरणात न्यायालयाने तपास यंत्रणांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याची पोलिस कोठडी 26 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा आदेश देण्यात आला.
ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप या प्रकरणात केंद्रस्थानी आहे. तपासादरम्यान पीडितेला पाणी, पेढे आणि इतर पदार्थांच्या माध्यमातून बेशुद्ध करून गैरप्रकार केल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी आरोपीचा ताबा आवश्यक असल्याची भूमिका विशेष तपास पथकाने मांडली. सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना या गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले. आरोपी महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत होता, तसेच त्यांच्या कुटुंबावर संकट येईल अशी भीती दाखवत त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, अशा प्रकारच्या आणखी घटना घडल्या असण्याची शक्यता तपासण्यासाठी आरोपीची चौकशी आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
बचाव पक्षाने पोलिस कोठडी वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध केला. अशोक खरातच्या वकिलांनी न्यायालयात तीव्र नाराजी व्यक्त करत, सर्व प्रकरणांमध्ये सारख्याच प्रकारचे आरोप मांडले जात असल्याचा दावा केला. प्रत्येक वेळी तेच पाणी, तेच पेढे असा उल्लेख करत त्यांनी तपास यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच आर्थिक व्यवहारांचा ठोस उल्लेख नसतानाही त्या दिशेने तपास चालवला जात असल्याची टीकाही करण्यात आली. यावर तपास अधिकार्यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळ्या महिला पीडित असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे आणि बारकाईने तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याची पोलिस कोठडी आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपास पथकाची मागणी मान्य करत अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या निर्णयामुळे तपास यंत्रणांना पुढील तपासासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS