नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि
नांदेड : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २०२६ ची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिले आहेत.
जिल्हा नियोजन भवन येथे या निवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण वर्गात त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी रत्नदिप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह विविध कक्षांचे नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. माधवी खोडे-चवरे म्हणाल्या की, “निवडणूक कामांबाबत मतदारांची कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. पूर्वीचा मोठा अनुभव असला, तरी अतिआत्मविश्वास न बाळगता आयोगाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. तसेच निवडणूक कर्तव्य बजावताना समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) वापर अत्यंत काळजीपूर्वक व जबाबदारीने करावा.”
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरक्षित पार पाडण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मतदान व मतमोजणी केंद्रावर विशेष खबरदारी घेतली जाईल. या निवडणुकीचे मतदान गुरुवार, १८ जून २०२६ रोजी संबंधित महसूल उपविभागाच्या मुख्यालय असलेल्या तहसील कार्यालयांत होणार असून, मतमोजणी सोमवार, २२ जून २०२६ रोजी जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे.

COMMENTS