महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्ष (भाजप) कडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) व

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पक्ष (भाजप) कडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस) विरोधात बुधवारी सकाळी 10:30 वाजता बीडमध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले. काँग्रेसने महिला आरक्षणाला विरोध दर्शवल्याचा आरोप करत भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.
हे आंदोलन भाजपच्या बीड नगरपरिषदेच्या गटनेत्या व नगरसेविका डॉ. सारिकाताई योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान हम भारत की नारी है, फूल नहीं चिंगारी है आणि काँग्रेसचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या घोषणांमधून महिलांच्या हक्कांबाबतचा आक्रमक सूर स्पष्टपणे दिसून आला. आंदोलनात जिल्हा सरचिटणीस मीराताई गांधले, ड. संगीता धसे, नगरसेविका समीक्षा शेटे, भाग्यश्री देशपांडे, भाग्यश्री तांबारे, संध्या मिश्रा, शहर उपाध्यक्ष प्रीत कुकडेजा यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांचा मोठा सहभाग हे आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. यावेळी बोलताना डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, महिलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात समान संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. मात्र, काँग्रेसने या निर्णयाला विरोध करून महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचे काम केले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, महिलांच्या हक्कांबाबत केवळ घोषणाबाजी करणार्या काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी भाजप कायम कटिबद्ध राहिला आहे आणि पुढेही राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या या आंदोलनामुळे बीडमध्ये महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आगामी काळात या विषयावर राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS