नागपूरमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, तर नगरमध्ये काँग्रेसला

Homeसंपादकीयदखल

नागपूरमध्ये शिवसेनेला धोबीपछाड, तर नगरमध्ये काँग्रेसला

राज्यात महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. आघाडीत बिघाडी होण्याचे प्रसंग वारंवार घडतात. नागपूर आणि नगरमध्येही स्थानि

..तर, एकूण लोकशाहीचीच नव्याने चर्चा आरंभ करावी लागेल!
सीमाप्रश्न राजकारणाचे हत्यार नव्हे !
बाबासाहेबांचा किमान वेतनाचा कायदा सरकारकडूनच धाब्यावर

राज्यात महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नाही, याचा प्रत्यय वारंवार येत आहे. आघाडीत बिघाडी होण्याचे प्रसंग वारंवार घडतात. नागपूर आणि नगरमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. नागपूरमध्ये दोन्ही काँग्रेसनं शिवसेनेला, तर नगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मिळून काँग्रेसला धोबीपछाड दिला. 

एकापेक्षा अधिक पक्ष सत्तेत असले, तरी ते त्यांचं बळ वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात. बर्‍याचदा विरोधी पक्षांचं अवकाश व्यापण्याऐवजी ते मित्रपक्षांचंच खच्चीकरण करीत असतात. भारतीय जनता पक्षाला राज्यात मिळालेलं यश हे शिवसेनेचं खच्चीकरणानं आहे, हे वेगळं सांगायला नको. राज्यात भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते परस्परांविरुद्ध लढले होते. मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक महापालिकांच्या निवडणुका परस्परांविरोधात लढताना या दोन पक्षांच्या नेत्यांची भाषा खालच्या पातळीवरची होती, तरीही राज्याच्या सत्तेत ते मांडीला मांडी लावून बसले होते. महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. काँग्रेसनं स्वबळाचा दिलेला नारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिव्हारी लागला. तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोक तुम्हाला जोड्यानं हाणतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं. पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेविरोधात ठाकरे यांनी थेट काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडं तक्रार केली. त्यानंतर पटोले यांचा सूर काहीसा मवाळ झाला. पटोले यांच्या स्वबळाच्या नार्‍याला सुशीलकुमार शिंदे, भाई जगताप वगळता अन्य कुणाची फारशी साथ मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढविण्याचा प्रत्येकाला अधिकार असतात, असं सांगून वाद टाळला. ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही स्वबळाच्या नार्‍यावरून टार्गेट केलं. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्यानं निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं, तर लोक तुम्हाला जोड्यानं हाणतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला होता. त्याची मात्रा लागू पडली, असं वाटत असतानाच नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतं आहे. काँग्रेस स्वबळाची भाषा वापरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते; परंतु नागपूरमध्ये शिवसेनेनं युतीसाठी प्रस्ताव देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर लवकर निर्णय न दिल्यानं शिवसेनेनं आता स्वबळाची वाट धरली आहे. त्यामुळं नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळं शिवसेना, भाजप आणि आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 61 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची माहिती शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी दिली. कार्यकर्त्यांना संधी मिळावी, म्हणून शिवसेना स्वबळावर पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असं जैसवाल यांनी सांगितलं. पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दांत पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता. फारच टीका झाल्यानंतर पटोले यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल. महाविकास आघाडी तात्पुरती आहे, असं पटोले यांनी सांगितलं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र जोमानं लढतील, अशी घोषणा पवार यांनी केली होती; मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असं पटोले वारंवार सांगत होतं. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. नागपूरमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असताना दुसरीकडे पटोले यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं म्हटलं आहे. स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते संघटनेची आवश्यकता असते. त्याचा पटोले यांना विसर पडला आहे. सत्तेतील अन्य दोन पक्षांवर दबाव वाढवण्यासाठी भाजपत गेलेले नेते काँग्रेसमध्ये परत येणार असल्याचं पटोले सांगत असले, तरी असा फार ओघ सुरू झालेला नाही. नेते आले म्हणजे संघटना मजबूत होत नसते, तर ती सूज असते. जी भाजपला सध्या झाली आहे. काँग्रेसमध्ये येणार्‍यांची आपल्याकडं मोठी यादी आहे; पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असं पटोले सांगत आहेत. हे चांगले असलं, तरी सामान्य कार्यकर्त्यालाही बळ द्यावं लागतं. ताकद द्यावी लागते. काँग्रेसकडे ती आहे, असे वाटत नाही. मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात ज्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची संभावना भाजपची ’बी टीम’ म्हणून काँग्रेसचे नेते करीत होते, त्याच आंबेडकरांशी आता जुळवून घेण्याची भाषा केली जात आहे; परंतु आंबेडकर यांनी ज्या पद्धतीनं दोन्ही निवडणुकांत जागांची मागणी केली, ते पाहता आणि सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी वंचित आघाडीचा असलेला महत्त्वाचा वाटा पाहिला, तर काँग्रेसचे किती नेते पटोले यांच्या मताशी सहमती दाखवून अ‍ॅड. आंबेडकर यांच्यांशी जुळवून घ्यायला तयार होतील, याबाबतही साशंकता आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीनं अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल; मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळं राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत जसे मिळत आहेत, तसंच स्वबळाच्या नार्‍याला पटोले हेच तिलांजली देत आहेत, असा त्याचा अर्थ आहे. नागपूरमध्ये दोन्ही काँग्रेसनं एकत्र येऊन शिवसेनेला एकटं पाडलं, तसंच नगरमध्ये भाजपबरोबरच्या सत्तेतून बाहेर पडत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडलं. अर्थात त्याला काँग्रेसचे स्थानिनक नेते जबाबदार आहेत. किरण काळे यांच्या कच्छपी पक्ष लागला. त्यात पक्षाचं नुकसान होणार आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी असताना काँग्रेस कायम आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात पवित्रा घेत असते. जगताप आणि काळे यांच्यात ते एका पक्षात असताना संघर्ष झाला. मारामार्‍या झाल्या. त्यांच्यातील पूर्ववैमनस्य दोन पक्षातील संघर्षाला कारण ठरत आहे. नगरमध्ये काँग्रेसचं फारस बळ नाही. अशा स्थितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येणं हे काँग्रेसच्या दृष्टीनं आणखी धोकादायक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विधानसभेच्या निवडणुकीसाठी संघर्ष व्हायचा; परंतु गेल्या दोन निवडणुकीतील पराभवानं तसंच अनिल राठोड यांच्या निधनानं आता शिवसेनेकडं तेवढ्या ताकदीचा उमेदवार राहिला नाही. त्यामुळं आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरीही कमी होणार आहे. काळे यांनी मागं शिवसेनेशी विशेषतः जुळवून घ्यायचं ठरविलं होतं. मित्रपक्षाच्या आमदारावर टीका करताना ते शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचं कौतुक करीत होते. काळे यांच्यामुळं काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून त्याचा फटका आता काँग्रेसला बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिल्यानं किमान पाच जागा मिळाल्या होत्या. पक्षाची ही भूमिका नगरसेवकांना फारशी पटलेली नाही. त्यामुळं काही आजी-माजी नगरसेवक आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर तर काही विखे यांच्याबरोबर आहेत. काँग्रेसचा स्वतःचं असं काहीही राहिलं नाही. 

COMMENTS