Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; पत्नी फरार, मुलगा ताब्यात ; तपासाला नवे वळण

नाशिक : भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच बुधवारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दि

Solapur : या महामार्गाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे (Video)
Navi Mumbai : महिला डॉक्टर असल्याचा बनाव करत सोनाराची लूट (Video)
रेल्वेत चढतांना पाय घसरला… महिला रक्षकाने वाचवले प्राण… पहा व्हिडीओ

नाशिक : भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असतानाच बुधवारी न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, यामुळे तपासाच्या पुढील टप्प्याला नवे वळण मिळाले आहे.
यापूर्वी पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने विशेष तपास पथकाने कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी नाकारत न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. दरम्यान, खरातविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या तक्रारींची संख्या वाढत असल्याने तपास यंत्रणांवर अधिक दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारी उशीरा रात्री खरातच्या निवासस्थानी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी परिसरातील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तपास पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाली. पोलिस तिचा शोध घेत असून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
याचवेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासात सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत तपास अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आवश्यक माहिती मिळवण्यासाठी मुलासमोरच खरातची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणांनी दर्शवली होती. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारींवर भर देण्यात येत असून, त्यानंतर आर्थिक व्यवहार, देणघेण आणि फसवणुकीच्या साखळीचा मागोवा घेतला जाणार आहे. विविध आर्थिक नोंदी आणि संबंधित व्यवहारांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने तपासाचा फास अधिक घट्ट करत संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले आहे. खरातचा आर्थिक सल्लागार, मंदिराशी संबंधित पुजारी तसेच एका सराफ व्यावसायिकाची सखोल चौकशी करण्यात आली. मंदिरातील हालचाली, देणग्या आणि आर्थिक व्यवहार यामधील संभाव्य गैरप्रकार उघड करण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहेत. एकूणच, अशोक खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असून, फरार पत्नीचा शोध, आर्थिक व्यवहारांचा तपास आणि पीडितांच्या तक्रारी या तिन्ही आघाड्यांवर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. आगामी काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शाकाहारी लोकांना खाऊ घातले मासे
धार्मिक श्रद्धा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत शाकाहारी नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा शाकाहारी व्यक्तींना मासा हा पाण्यातील वनस्पती आहे असा खोटा दावा करत असे. त्याचबरोबर मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात असे भ्रामक सांगून लोकांची समजूत घालण्यात येत होती. या बनावट दाव्यांच्या आधारे काहींना ‘प्रसाद’ म्हणून मासे खाण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे. या प्रकारात काही जैन धर्मीय व्यावसायिकांसह इतर शाकाहारी नागरिकांचीही फसवणूक झाल्याची माहिती पुढे आली आहे.


विशेष सरकारी वकिलांची माघार
बहुचर्चित खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांनी अचानक माघार घेतल्याने तपास प्रक्रियेत नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मुख्य आरोपी अशोक खरात प्रकरणात प्रभावीपणे बाजू मांडण्यासाठी तपास पथकाने अजय मिश्रा यांना विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यासाठी लेखी विनंती केली होती. मात्र त्यांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना त्यांनी सध्या अनेक महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये व्यस्त असल्याचे सांगितले.

COMMENTS