Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईचा भडका; व्यावसायिक गॅस महागला; गॅस 195 रूपयांनी तर जेट इंधन दरात 100 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच महागाईने जोरदार उसळी घेतली असून इंधन दरवाढीच्या दुहेरी धक्क्याने देशातील अर्थचक्रावर ताण वाढण्याची

मार्चमध्ये जीएसटी महसूल दोन लाख कोटींच्या पुढे
भारतीय सीमारेषेवर ड्रोन आणि सेन्सरने निगराणी
माझ्या शांततेला माझा पराभव समजू नका : राघव चड्ढा

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच महागाईने जोरदार उसळी घेतली असून इंधन दरवाढीच्या दुहेरी धक्क्याने देशातील अर्थचक्रावर ताण वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात 195 रूपयांची वाढ झाली असून, जेट इंधनाच्या किमतींनी देखील 100 टक्क्यांनी वाढल्यामुळे अन्नपदार्थांपासून हवाई प्रवासापर्यंत सर्वच गोष्टी महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठी लागणार्‍या 19 किलो गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 195 रुपयांहून अधिक वाढ जाहीर केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये या सिलेंडरची किंमत 2 हजार 78 रुपयांच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यातही 114 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे केवळ एका महिन्यात गॅस दरात तीनशे रुपयांपेक्षा अधिक वाढ झाल्याने व्यापार्‍यांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हॉटेल, भोजनालय, ढाबे, कॅन्टीन तसेच केटरिंग व्यवसायावर होणार आहे. इंधन खर्च वाढल्याने या क्षेत्रातील व्यावसायिकांना दर वाढविण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे बाहेरचे जेवण, नाश्त्याचे पदार्थ आणि लग्नसमारंभातील खाद्यव्यवस्था महाग होण्याची शक्यता आहे. परिणामी, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चातही वाढ होणार आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नसला, तरी व्यावसायिक दरवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम घरगुती अर्थकारणावर होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे, हवाई क्षेत्रालाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ करण्यात आल्याने त्याची किंमत प्रथमच प्रति किलोलीटर दोन लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये जेट इंधनाचा दर दोन लाख सात हजार रुपयांहून अधिक झाला असून, ही वाढ शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यातही जेट इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती, त्यामुळे सलग दुसर्‍यांदा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या वाढीमुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात मोठी वाढ होणार आहे. इंधन हा विमान कंपन्यांच्या एकूण खर्चातील सर्वात मोठा घटक मानला जातो. त्यामुळे खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम तिकीट दरांवर होतो. परिणामी, येत्या काळात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम पर्यटन, व्यावसायिक दौरे आणि मालवाहतूक यावरही होऊ शकतो. महागाईच्या या वाढीमागे आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिर परिस्थिती हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत
पश्‍चिम आशियातील वाढते तणाव, लष्करी संघर्ष आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील अडथळे यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. विशेषतः, तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सागरी मार्ग बंद पडल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात-आधारित देशांवर होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम अन्नधान्य, भाजीपाला, किराणा तसेच इतर वस्तूंच्या किमतींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडतो. एकूणच, गॅस सिलेंडर आणि जेट इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा दबाव वाढत असून, त्याचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेत उमटण्याची शक्यता आहे.

COMMENTS