अकोले : मनातली जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अढळ आत्मविश्वास यांची साथ मिळाली तर अशक्य वाटणारी शिखरेही सर करता येतात… याची जिवंत साक्ष अकोलेच्या

अकोले : मनातली जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अढळ आत्मविश्वास यांची साथ मिळाली तर अशक्य वाटणारी शिखरेही सर करता येतात… याची जिवंत साक्ष अकोलेच्या लेकीने दिली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या मणिकर्णिका देशपांडे हिने हिमालयातील ‘केदारकंठ’ शिखर सर करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे.
नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित शिशु विहार मराठी माध्यम शाळेतील मोठ्या गटातील विद्यार्थिनी मणिकर्णिका प्रवर मोनिका देशपांडे हिने दि. १९ ते २० मार्च २०२६ दरम्यान उत्तराखंडमधील ‘केदारकंठ’ शिखर यशस्वीरीत्या सर केले. सुमारे १२,५०० फूट उंचीवर असलेल्या या शिखराचा एकूण २५,००० फूटांचा प्रवास पूर्ण करत तिने हे अभूतपूर्व यश मिळवले.
अवघ्या सहा वर्षांच्या वयात हा पराक्रम करणारी ती भारतातील पहिली बालगिर्यारोहक ठरली आहे. यापूर्वी हे शिखर अनुक्रमे ७ व ८ वर्षांच्या मुलांनी सर केले होते. केदारकंठ मोहिमेदरम्यान मणिकर्णिकाला अत्यंत कठीण नैसर्गिक परिस्थितीचा सामना करावा लागला. प्रचंड वेगाने वाहणारे थंड वारे, सततचा पाऊस, हिमवर्षाव आणि हिमालयीन वन्यजीवांची भीती अशा अनेक आव्हानांवर मात करत तिने ही मोहीम पूर्ण केली. तिची चिकाटी, सहनशक्ती आणि जिद्द यामुळेच हे यश शक्य झाले.
मणिकर्णिका ही अकोले येथील हिंद सेवा मंडळ संचालित मॉडर्न हायस्कूलचे माजी प्राचार्य स्व. अनंतराव देशपांडे यांची पणती असून, सेवानिवृत्त प्राचार्य शिरीष व चंद्रशेखर देशपांडे यांची नात आहे. शैक्षणिक आणि संस्कारक्षम वातावरणाचा वारसा लाभल्यामुळेच तिच्या कर्तृत्वाला योग्य दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.या मोहिमेसाठी संस्थेचे प्रोत्साहन, शाळेचे पाठबळ तसेच शिवम जाधव, रोहित पातळे आणि ‘द सर्चिंग सोल’ या संस्थेचे ट्रेक लीडर अभिषेक रावत व राममोहन यांचे मार्गदर्शन मणिकर्णिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
कसे आहे ‘केदारकंठ’?
उत्तराखंड राज्यातील हिमालय पर्वतरांगांमधील ‘केदारकंठ’ हे एक महत्त्वाचे गिरीशिखर मानले जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे १२,५०० फूट (३,६०० मीटर) उंचीवर वसलेले हे शिखर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ‘जुडा का तलाव’ येथे भगवान शंकरांनी जटा धुतल्याची आख्यायिका प्रचलित असून, त्यामुळेच या शिखराला ‘महादेवांचा कंठ’ अशी ओळख आहे.
अडथळ्यांवर मात करून विजय
ट्रेकिंगच्या सुरुवातीला मणिकर्णिकाचे वय कमी असल्याने तिला चढाईस परवानगी देण्यास नकार देण्यात आला होता. मात्र, तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर सर्व अडथळे कमी पडले. अखेर परवानगी मिळाल्यानंतर तिने अतिशीत वारे, सततची बर्फवृष्टी, हिमालयीन वन्यजीव आणि कठीण भूप्रदेश यांचा धैर्याने सामना करत यश मिळवले.

COMMENTS