सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या

अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील हॉस्पिटलच्या जळीत कांडाच्या तपासात पोलिसांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा लागला आहे. सिव्हीलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले अस

सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक
सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?

अहमदनगर/प्रतिनिधी : सिव्हील हॉस्पिटलच्या जळीत कांडाच्या तपासात पोलिसांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा लागला आहे. सिव्हीलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले असले तरी त्याचा डीव्हीआर देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी आपला खाक्या दाखवून तो ताब्यात घेतला. दरम्यान, या जळीतकांडाचा 40 टक्के तपास पोलिसांनी पूर्ण केला असून, चार महिलांना अटक केली आहे. लवकरच या प्रकरणातील आणख़ी गुन्हेगार निष्पन्न केले जाऊन त्यांना अटक केली जाणार आहे.

मागील शनिवारी (6 नोव्हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलच्या नव्या इमारतीतील तळमजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागाला विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प या तिन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी या तपास मोहिमेवर होते. त्यांनी बर्‍यापैकी तपासात पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. आता हा तपास शहर विभागाचे प्रभारी उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलिसांचा स्वतंत्र तपास
सिव्हील जळीतकांडाची विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समितीद्वारे स्वतंत्रपणे चौकशी होत आहे तर नगर जिल्हा पोलिस त्यांच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत आहेत. महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना बोलावून त्यांच्याकडून तांत्रिक माहितीचे संकलन करण्यात आले आहे. तसेच सिव्हीलमधील सीसीटीव्ही ़फुटेज घटना घडल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याचा डीव्हीआर देण्यास टाळाटाळ होत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने तो ताब्यात घेतला व त्यावरूनही तपास सुरू केला आहे.

22 तास सुरू होती तपासणी
सिव्हीलमधील आगीची घटना घडण्याआधी तासभराचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर डीव्हीआर ताब्यात आल्यावर तब्बल 22 तास सिव्हीलमध्ये आगीच्या आधी व नंतर घडलेल्या प्रत्येक घटनेची तपासणी करून व ती पॉईंटआऊट करून ठेवली गेली आहे. या तपासणीतून कोण त्यावेळी कोठे होते, काय करीत होते, घटना घडल्यावर कोणी काय केले, कोण कोठे होते, अशा सर्व अनुषंगाने मुद्यांची नोंद पोलिसांनी केली आहे. आगीची घटना घडल्यावर व त्याची भीषणता स्पष्ट झाल्यावर लगेच पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिस यंत्रणेला चौकशीच्या कामाला लावले होते. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणाचा सुमारे 40 टक्क्यावर तपास झाला आहे. दोन शासकीय कर्मचार्‍यांचे जबाबही पूर्ण झाले असून, काहीजणांचे कलम 164नुसार तहसीलदारांसमोर जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. दुर्घटनेत मरण पावलेल्यांचे नातेवाईक, जखमींचे नातेवाईक तसेच अन्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचेही जबाब घेतले गेले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनीही पोलिसांच्या तपासाचा आढावा घेतला असून, सीसीटीव्ही फुटेजही पाहून तपासाच्यादृष्टीने काही सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, सिव्हीलमध्ये आग लागल्याची माहिती तोफखाना पोलिसांना कोणा तरी अज्ञात व्यक्तीने कळवली होती. सिव्हीलकडून कळवले गेले नव्हते. त्यामुळे त्यामागचे कारणही पोलिस तपासात शोधले जाणार आहे. पोलिसांच्या तपासात बर्‍यापैकी पुरावे गोळा झाले असल्याने या दुर्घटनेला नेमके जबाबदार कोण, हे लवकरच निष्पन्न होण्याचा विश्‍वास पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

एक रुग्ण रांगत बाहेर आला..
सिव्हीलमध्ये आग नेमकी कशी व कशामुळे लागली ही गोष्ट अद्याप अस्पष्ट असली तरी सुरुवातीला छताच्या बाजूने धूर निघत असल्याचे दिसून आले आहे. आगीनंतर मात्र अतिदक्षता विभागातील कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा पोलिसांना आढळून आला आहे. त्यांनी थोडा धोका पत्करला असता तर अनेकांचे जीव वाचले असते. त्यावेळची परिस्थिती पाहता रुग्णांना तत्काळ बाहेर काढण्यास बर्‍यापैकी संधी होती. काही रुग्णांचे नातेवाईक धावत येऊन आपल्या रुग्णांना घेऊन जाताना दिसले. एक रुग्ण तर स्वत: रांगत बाहेर येताना दिसून आला. मात्र, ज्यांची जबाबदारी होती, ते आरोग्य कर्मचारी बचाव कार्य करताना दिसून येत नाहीत, असे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे आता पोलिसांनी पुराव्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे, जिल्हा रुग्णालयाकडून कागदपत्रे मागविली असून, घटनेच्यावेळी कोणाची ड्युटी कोठे होती, कोणाचे वर्तन कसे होते, कोणी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, याचा तपास पोलिस करीत आहेत. यासाठी फॉरेन्सिक लॅबसह अन्य तज्ज्ञांचे अहवाल, कागदपत्रे यांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

डॉ. पोखरणांवर कारवाई प्रस्तावीत
जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या निलंबनाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर आरोग्य विभागाकडून डॉ. पोखरणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कार्यभार डॉ. भूषणकुमार रामटेके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शनिवारी (दि.6) जिल्हा रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. राज्यभरात या घटनेमुळे खळबळ उडाली. या घटनेनंतर डॉ. पोखरणा यांच्याविरोधात कारवाई मागणी करण्यात आली होती. आरोग्यमंत्री टोपे यांनी डॉ. पोखरणा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे, डॉ. विशाखा शिंदे व स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित केल्याची, तर आस्मा शेख व चन्ना आनंत यांची सेवा समाप्त केल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी तीन स्टाफ नर्ससह वैद्यकीय अधिकारी शिंदे यांना अटकही केलेली आहे. आता आरोग्य विभागाकडून डॉ. पोखरणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. आगीच्या घटनेत मोठी जीवितहानी व रुग्णालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई नियोजित आहे. त्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषणकुमार रामटेके यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश आरोग्य विभागाच्या नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. पी. जी. गांडाळ यांनी मंगळवारी काढले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून डॉ. पोखरणा व डॉ. ढाकणे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

COMMENTS