सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेल्या जळीतकांडाच्या घटनेसंदर्भातला तपास पोलिस स्वतंत्ररीत्या करत आहेत. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी

सिव्हील जळीतकांडाचा अहवाल तयार…हलगर्जीपणाचा ठपका?
सिव्हील जळीतकांडाच्या तपासात दाखवावा लागला पोलिसी खाक्या
सिव्हील जळीतकांड प्रकरणी चार महिलांना झाली अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेल्या जळीतकांडाच्या घटनेसंदर्भातला तपास पोलिस स्वतंत्ररीत्या करत आहेत. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण दुसरीकडे आम्हीसुद्धा एक्सपर्ट टीम बोलावून सर्व माहिती एकत्रित करीत आहोत. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील कलमांमध्येही वाढ होऊ शकते, असे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
शेखर यांनी जिल्हा रुग्णालयांमध्ये घडलेल्या घटनेच्यासंदर्भामध्ये माहिती घेतली तसेच समक्ष जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन पाहणीही केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. शेखर म्हणाले की, नगर जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज यासंदर्भातील मिळालेले आहे. एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील ज्यांचे कर्तव्य होते, त्यातील काहीजण मदत कार्यात दिसत नाहीत, ही सुद्धा बाब निदर्शनास आलेली आहे. त्या संदर्भातील चौकशी सुरू आहे. जर वेळेमध्ये या रुग्णांना बाहेर काढले असते, तर निश्‍चितपणे काहींचे प्राण सुद्धा वाचले असते. यात निष्काळजीपणा करणारे जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई पोलिस करणार असून या सर्व बाबींचा तपास सध्या सुरू आहे. दोन दिवसापासून सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य माहिती सुद्धा पोलिसांनी घेतली आहे. काहीजणांचे जबाब सुद्धा घेण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावितरण विभागाचे अधिकारीसुद्धा नगर येथे दाखल झाले आहे. तेसुद्धा या घटनेची माहिती घेऊन नेमका हा प्रकार कशामुळे घडला, याचा तपास करत आहेत. आग कशामुळे लागली हे तपासानंतरच आता निष्पन्न होईल, असेही शेखर यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी आग लागली, तेथे ट्रिप होऊन वीज खंडित झाली होती, असे दिसून येत आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, चौकशी समितीचा तपास प्रशासकीय दृष्ट्या सुरू आहे. त्यांची चौकशी स्वतंत्र असून, आम्ही गुन्हा दाखल झाला त्यानुसार आमचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तपास मिटकेंकडे
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांडाबाबत तोफखाना पोलिसात दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे. मागील शनिवारी (6 नोव्हेंबर) जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मृत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 304 (अ) अन्वये गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावरच दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता त्याचा तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस उपअधीक्षक मिटके (उपअधीक्षक श्रीरामपूर विभाग व अतिरिक्त कार्यभार अहमदनगर शहर विभाग) यांच्याकडे वर्ग केला आहे.

COMMENTS