नगर अर्बनच्या माजी संचालकांना खा. डॉ. विखेंचा पाठिंबा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर अर्बनच्या माजी संचालकांना खा. डॉ. विखेंचा पाठिंबा

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीत उतरलेल्या 8 माजी संचालकांसह सहकार मंडळाच्या अन्य उमेदवारांना नगर दक्षिणेचे भाजप

नगर अर्बन प्रकरणातील डॉक्टरांचे जामीन फेटाळले
नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी
घोटाळेबाज पुन्हा नगर अर्बनमध्ये येण्याच्या तयारीत ?; बँक बचावच्या गांधींनी दिले खुल्या चर्चेचे आव्हान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेच्या निवडणुकीत उतरलेल्या 8 माजी संचालकांसह सहकार मंडळाच्या अन्य उमेदवारांना नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठिंबा दिला आहे. नगर अर्बन बँकेच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहनही खा. विखे यांनी केले. दरम्यान, माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या परिवाराने आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात सहकार पॅनेलच्या प्रचाराची दणक्यात सुरुवात करण्यात आली.नगर अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी (स्व.) दिलीप गांधी प्रेरित सहकार पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी सकाळी ग्रामदैवत श्रीविशाल गणपती मंदिरात महाआरती करून बँकेचे ज्येष्ठ सभासद व उद्योजक श्रीगोपाल धूत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी माळीवाड्यापासून ढोल-ताश्यांच्या गजरात जोरदार शक्तीप्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्यात आली. उद्योजक मोहन मानधना, श्रीमती सरोज गांधी, पारनेरचे माजी सभापती उमाजी वाळूंज, माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे, नगरसेवक मनोज कोतकर, भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, बाबू बोरा, विजय मंडलेचा, चेतन जग्गी आदी उपस्थित होते. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करीत बाजारपेठेतून प्रचार फेरी काढण्यात आली. केशर गुलाब मंगल कार्यालयात गांधी परिवाराच्यावतीने दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. (स्व.) दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. या सभेला खा.डॉ. सुजय विखे यांनी उपस्थिती लावून सहकार पॅनलला शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते म्हणाले, संघर्षमय पद्धतीने दिलीप गांधी यांनी भाजपचे काम जिल्ह्यात वाढवले. कार्यकर्त्यांच्या मनात क्रांतीची चिंगारी त्यांनी पेटवली. पूर्वीपासून अर्बन बँक व जिल्ह्याचे राजकारण असे समीकरण आहे. अर्बन बँकेत (स्व.) दिलीप गांधी यांनी केलेले काम कधीही विसरू शकत नाही. भ्रष्टाचाराचे कितीही आरोप झाले तरी या निवडणुकीत त्यांचे सहकार पॅनल विजयी होणार, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. सहकार पॅनलच्या सर्वच्या सर्व 18 उमेदवार निवडून आणा हीच स्व.दिलीप गांधी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन श्रीमती गांधी यांनी केले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. सुवेंद्र गांधी म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी आमच्यावर केले आहेत. मात्र न्याय देवतेने आम्हाला सशर्त जामीन मंजूर करत न्याय दिला आहे. कायम सत्याचाच विजय होत असतो. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीतही आमचा विजय निश्‍चीत आहे, असे ते म्हणाले. अशोक कटारिया यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत त्यांचे खंडण केले. बिनविरोध निवडून आलेले सुरतचे दिनेश कटारिया, साईदीप अग्रवाल, बंडू रासने, बाळासाहेब महाडिक, ईश्‍वर बोरा आदींनी मनोगते व्यक्त केली. बँक निवडणूक प्रचार समितीचे समन्वयक अ‍ॅड.राहुल जामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अर्बन बँकेच्या निवडणुकी साठी सहकार पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यात नगर शहर मधून दीप्ती गांधी, अनिल कोठारी, शैलेश मुनोत, राजेंद्र अग्रवाल, ईश्‍वर बोरा, राहुल जामगावकर, महेंद्र उर्फ भय्या गंधे, संपत बोरा, गिरीश लाहोटी व अजय बोरा, शाखा मतदार संघातून अशोक कटारिया (पारनेर), अतुल कासट (संगमनेर), कमलेश गांधी (शेवगाव) व सचिन देसर्डा (नेवासा). अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मनेष साठे, महिला राखीव संगीता गांधी व मनीषा कोठारी आदींनी उपस्थितांना अभिवादन केले. दरम्यान, दीड वर्षांनी दिवाळी फराळानिमित्त जिल्ह्यातील कार्यकर्ते एकमेकांना भेटल्याने गप्पांचे फड रंगले.

मी गांधी कुटुंबाच्या मागे-डॉ. विखे
(स्व.) दिलीप गांधी यांचे नगरच्या विकासासाठी व अर्बन बँकेच्या विकासाबरोबरच प्रत्येक कार्यकर्ता उभा करण्यात मोठे योगदान आहे. अर्बन बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला. आज जरी ते नसतील तरी त्यांचे अस्तित्व कायम टिकून आहे. नगरमध्ये उद्योेजकता निर्माण करण्यासाठी व नवीन पिढीला उद्योग धंद्यांची जोड देण्यासाठी (स्व.) गांधी यांनी केलेले काम सुवेंद्र गांधी यापेक्षा अधिक पुढे नेतील, असा मला विश्‍वास आहे, असे सांगून खा.डॉ. सुजय विखे म्हणाले, अर्बन बँकेच्या पुढच्या चांगल्या भविष्यासाठी तसेच दिलीप गांधी यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनी मोठ्या मनाने सहकार पॅनलला साथ द्यावी, असे आवाहन केले. दिलीप गांधी यांनी मदत केली नसती तर मीही खासदार झालो नसता,े ही वास्तविकता नाकारता येणार नाही. ज्या पद्धतीने गांधी कुटुंबीय माझ्या मागे उभे राहिले, त्याप्रमाणे विखे कुटुंब गांधी परिवारामागे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

COMMENTS