विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सख्य सर्वश्रुत आहे. या दोस्तीला आता

आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…
तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार?; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल, सुनावणीकडे लक्ष
आमदार निलेश लंकेचे खासदार विखेंना थेट आव्हान…तर लोकसभेच्या रिंगणात उतरणार

अहमदनगर/प्रतिनिधी-नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे सख्य सर्वश्रुत आहे. या दोस्तीला आता तगडे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. विखेंचे विरोधक पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके व जगतापांचे नगर शहरातील विरोधक शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एकमेकांशी मैत्रबंध जुळवले आहेत. त्यामुळे आता दक्षिण नगर जिल्ह्याच्या राजकारणात आता विखे-जगताप विरोधात लंके-काळे अशी राजकीय फाईट रंगण्याची चिन्हे आहेत. युवा नेत्यांच्या या दोन जोड्या परस्परांशी कसा शह-काटशह रंगवतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी मागील लोकसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली आहे. त्यावेळी जगतापांनी विखेंच्या हेलिकॉप्टर सफारींवर तोंडसुख घेतले तर विखेंनी जगतापांच्या वाहन शौकाचे वाभाडे काढले. पण, त्या निवडणुकीत विखेंनी बाजी मारून जगतापांचा पराभव केला. मात्र, नंतर निवडणुकीतील कटुता विरून गेली व सहाच महिन्यांनी झालेल्या नगर शहर विधानसभा निवडणुकीत जगतापांनी विजय मिळवला. अर्थात त्या निवडणुकीत जगतापांना विखेंनी साथ दिल्याचे अजूनही बोलले जाते. पण आता तो इतिहास झाला आहे. जगताप शहराचे दुसर्‍यांदा आमदार झाल्यावर व ते होण्याआधी त्यांनी भाजपचा महापौर मनपात बसवल्यावर भाजपचे खा. डॉ. विखे यांना केंद्र सरकारकडून नगर शहरात राबवायच्या योजनांसाठी जगतापांची मदत आवश्यक होती. त्यामुळे त्यांनी जगतापांशी जुळवून घेतले व आता तर या दोघांची मैत्री भाजप व राष्ट्रवादीमध्ये चर्चेत आहे. विखेंचे जगतापांशिवाय नगर शहरात पान हलत नाही, एवढेच नव्हे तर विखेंच्या शहरातील बहुतांश विकास कामांची उदघाटनेही जगतापांच्या हस्तेच होतात. विखेंच्या विकास कामांचा आढावा कार्यक्रमात तर जगतापांना भाषण करण्यास अडचण येऊ नये म्हणून चक्क खा. विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा लाईव्ह सुरू असलेला कार्यक्रम म्यूट केला. अशा या मैत्रीच्या अध्यायाला आता तगडे राजकीय आव्हान उभे राहू पाहात आहे. आ. लंके व काळे यांनी एकमेकांशी घट्ट मैत्री करीत विखे-जगतापांच्या मैत्रीला राजकीय सुरुंग लावण्याचा उद्देश ठेवला तर मग दक्षिणेतील राजकारण रंगतदार होणार आहे.

लंके-विखे व जगताप-काळे संघर्ष चर्चेत
पारनेर तालुक्यात आ. लंके यांचे बस्तान हळूहळू घट्ट होत चालले आहे. कोरोना काळातील त्यांच्या कोविड सेंटरचा लौकिक चर्चेत अजूनही आहे. पण विखे व लंके यांचा संघर्ष केके रेंज जमीन संपादनाच्या विषयापासून सुरू झालेला आहे. लष्कराच्या केके रेंज बाधितांना कोणी वाचवले, याचा श्रेयवाद विखे-लंके यांच्यात नेहमी सुरू असतो व त्यावरून परस्परांवर राजकीय टीकाटिपणीही होत असते. यामुळे, थेट पुढची नगर दक्षिणेतील खासदारकी विखेंविरोधात लंके लढणार, अशाही चर्चा मध्यंतरी होत्या. तर दुसरीकडे नगर शहरातील राजकारणात जगतापांच्याविरोधात काँग्रेसचे काळेही मागील सहा-सात वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. सुरुवातीला ते राष्ट्रवादीत असताना त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. त्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीत गेल्यावर त्यांनी थेट संघर्ष सुरू केला व आता काँग्रेसमध्ये असताना आणि राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व काँग्रेस असतानाही काळेंनी मनपा राजकारण व नागरी सुुविधांच्या विषयांवरून जगतापांना टार्गेट करणे सोडलेले नाही. त्यामुळे नगर शहरातील जगताप व काळे संघर्ष तर पारनेरमधील विखे-लंके संघर्ष नेहमीचा झाला आहे. तर दुसरीकडे विखे-जगताप मैत्री फुलत असताना लंके व काळे यांनीही दिलजमाई करीत विखे-जगतापांना शह देण्याचे नियोजन सुरू केल्याचे चित्र आहे. दक्षिण नगर जिल्ह्यातील हे राजकीय बदल भविष्यातील राजकारणात उलथापालथ घडवण्याची चिन्हे दाखवणारी आहेत. राष्ट्रवादीत असले तरी जगताप आणि लंके या दोघांमध्ये फारसे सख्य नसल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर, विखे-जगताप विरोधात लंके-काळे अशा भविष्यातील संघर्षाला राजकीय वर्चस्ववादाची किनार असणार असली तरी हा संघर्ष मात्र पारनेर व नगर शहराच्या राजकारणावरही परिणामकारक होण्याची शक्यता आहे.

लंकेंनी दिल्या काळेंना शुभेच्छा
नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके यांची पारनेरला जाऊन सदिच्छा भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आ.लंके यांच्या हंगा येथील कार्यालयात ही भेट झाली. यावेळी लंके यांनी काळे आणि शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा शाही थाटात सत्कार केला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसह एकत्र सत्तेत आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी काम केल्यास सामान्य माणसाचे प्रेम हे नक्कीच मिळत असते. समाज सेवा हेच खरे राजकारणाचे मुख्य उद्दिष्ट ठेवून नेतृत्वाने काम करायचे असते. काळे यांचे काम चांगले असून समाजाभिमुख आहे असे प्रतिपादन करत आ. लंके यांनी यावेळी काळे यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी काळे यांच्या समवेत ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, शहर क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुजित जगताप यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी काळे यांनी आ.लंके यांचे कौतुक करताना, त्यांनी कोरोना संकट काळात शरदचंद्र पवार आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोरोनाग्रस्तांसाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. नगर शहरात (स्व.) अनिलभैय्या राठोड यांच्याप्रमाणेच पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये आ.लंके हे सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. चोवीस तास उपलब्ध असणारा आणि तत्परतेने मदतीला धावून येणारा आमदार म्हणून लंके यांनी अल्पावधीमध्ये लौकिक मिळविला आहे, असे काळे यावेळी म्हणाले. कोरोना काळात लंके यांनी केलेल्या कामाबद्दल यावेळी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काळे यांच्या हस्ते लंके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, या भेटीच्यावेळी आमदार लंके आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळे यांच्यामध्ये सुमारे पंधरा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. विखे-जगताप यांची सहमती एक्सप्रेस सुरू असताना लंके-काळे यांच्यामध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी राजकीय धुरिणांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. नगर दक्षिणेच्या राजकारणात जगताप हे उघडपणे विखे यांच्याबरोबर असल्याचे पाहायला मिळत असताना काळे हे लंके यांच्यासमवेत दिसू लागल्यामुळे हा नगर शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS