आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…

वैद्यकीय अधीक्षकांच्या पत्रात स्पष्ट उल्लेख, सिव्हील सर्जन जिल्हाधिकार्‍यांशी बोलणारअहमदनगर/प्रतिनिधी- पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी

एकतर देवरेंची बदली करा, किंवा आमची तरी करा…; पारनेरच्या महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल
नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता

वैद्यकीय अधीक्षकांच्या पत्रात स्पष्ट उल्लेख, सिव्हील सर्जन जिल्हाधिकार्‍यांशी बोलणार
अहमदनगर/प्रतिनिधी- पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना मारहाण केली आहे व तसा स्पष्ट उल्लेख या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. यावेळी पारनेरचे पोलिस निरीक्षक बळपही उपस्थित होते, असेही यात म्हटले आहे. मात्र, मारहाण झालेले पाटील यांनी घुमजाव केले असून, आपल्याला मारहाण झालीच नाही, असा दावा केला आहे तर पोलिस निरीक्षक बळप यांनी, पाटील यांनी मद्यपान केले होते, असे स्पष्ट केल्याने या प्रकरणातील गूढ वाढले आहे. दरम्यान, सिव्हील सर्जन डॉ. अनिल पोखरणा यांनी संबंधित मारहाणीची घटना घडल्याचे समजले असून, याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याशी बोलणार असल्याचेही स्पष्ट केले.
पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधीक्षक डॉ.उंद्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बुधवारी (दि. 4) रात्री साडेआठ वाजता लसीचे टोकन वाटप करण्यासाठी तहसीलदार आणि डॉ. आडसुळ यांच्या आदेशानुसार लसीच्या लाभार्थ्यांना टोकणचे वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता आमदार लंके आणि रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे यांनी टोकन वाटप करणारे कनिष्ठ लिपीक राहुल पाटील यांना घरून बोलावले व त्यांच्यावर टोकन विकण्याचा आरोप करून त्यांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आ. लंके यांनी पाटील यांना मारहाण केली. तसेच कार्यरत महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. उंद्रे व डॉ. आडसूळ यांना शिवीगाळ करण्यात आली. ही घटना गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडलेली आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, असे या पत्रात म्हटले आहे.

संभ्रम वाढला
यासंदर्भात पोलिस निरीक्षक बळप यांचे म्हणणे आहे की, संबंधित प्रकाराच्यावेळी ते ग्रामीण रुग्णालयात उपस्थित नव्हते. मात्र, गडबड झाल्याचे कळल्यावर मी रुग्णालयात गेलो. लिपिक पाटील याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. टोकन वाटपात काही गडबड झाली असेल तर पाटील यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करता येईल, असे आपण आमदार लंके यांच्या निदर्शनास आणून दिले असून, यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर मारहाण झालेले पाटील यांनीही खुलासा केला असून, आ. लंके यांनी मला शिवीगाळ व मारहाण केलेली नाही. याबाबत सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे माझी बदनामी झालेली आहे. या संबंधित चुकीची व खोटी पोस्ट करणार्‍यांविरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील संभ्रम वाढला आहे.

..मग, निर्णय घेणार
मारहाणीच्या या प्रकाराबाबत बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा म्हणाले की, संबंधित लेखी तक्रार अजून माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण फोनवर मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना घडल्याचे समजले आहे. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS