नांदेड : पीपल्स कॉलेजच्या प्राचार्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून, घाईघाईत निश्चित करण्यात आलेली 28 मार्चच

नांदेड : पीपल्स कॉलेजच्या प्राचार्यपदाच्या नियुक्ती प्रक्रियेत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला असून, घाईघाईत निश्चित करण्यात आलेली 28 मार्चची मुलाखत तारीख मागे घेतल्याने संपूर्ण प्रक्रिया आता नियमबद्ध मार्गावर आली आहे. अर्जांची छाननी आणि ‘नाएसो’च्या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुलाखती निश्चित करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक सहसंचालक कार्यालयाने हस्तक्षेप करून ही तारीख रद्द केली.
दरम्यान, महाविद्यालयात सोमवारी वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्साह सुरू असतानाच मुलाखती पुढे ढकलल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली. उद्घाटन सोहळ्यात संस्थाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष अनुपस्थित राहिल्याने सचिव श्यामल दीपनाथ पत्की यांनी समारंभाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. या नियुक्ती प्रक्रियेत घडलेल्या घाईगडबडीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः, एका दिवसात मुलाखतींसाठी जाहिरात देण्यास परवानगी कशी मिळाली, याबाबत शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. काहींनी यामागे ‘अदृश्य पाठबळ’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन समितीतील एका सदस्याच्या अतिउत्साहामुळे संस्थेची प्रतिमा धोक्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही जागरूक प्राध्यापकांनी संयमाने आक्षेप नोंदविल्यानंतर प्रक्रियेत सुधारणा होत असल्याचे दिसून येते. पीपल्स कॉलेजला गुणवत्तापूर्ण आणि मूल्यनिष्ठ प्राचार्यांची परंपरा लाभलेली असताना, नव्या नियुक्ती प्रक्रियेत नियमबाह्य हालचालींचा आरोप झाल्याने संस्थेच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. प्राचार्यपदासाठी अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपली असून, छाननी समितीची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. विद्यापीठाकडून तीन विषयतज्ज्ञ आणि कुलगुरूंचे दोन प्रतिनिधी यांची नावे आधीच संस्थेला प्राप्त झाली आहेत. समितीचा अहवाल तयार झाल्यानंतर तो विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. नियमांनुसार, अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर सर्व संबंधितांना सोयीची ठरेल अशी तारीख निश्चित करून मुलाखती घेण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांच्या प्रतिनिधीवर असते. मात्र, यावेळी घाईने घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त झाल्यानंतर तो मागे घेण्यात आला. आता संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेकडे वळली असून, एप्रिल महिन्यात प्राचार्यपदासाठी मुलाखती पार पडतील, अशी माहिती ‘नाएसो’च्या सूत्रांनी दिली. त्यामुळे काहींसाठी दिलासा तर काहींसाठी प्रतीक्षा वाढल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS