मुंबई : देशभरात नीट परीक्षेचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या राज्य सामाईक प्रवेश परीक

मुंबई : देशभरात नीट परीक्षेचा पेपरफुटीनंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ’एमएचटी-सीईटी’च्या परीक्षेत देखील मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे, ’एमएचटी-सीईटी’कडून सर्व आरोप फेटाळून लावत परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित करत परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बारावीच्या परीक्षेत तुलनेने कमी गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षेत अत्यंत उच्च टक्केवारी कशी मिळाली, याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्राधिकरणाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना उत्तर देताना सांगितले की, समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्या पेपरफुटी, गुणांतील गैरव्यवहार किंवा निकालातील अनियमिततेच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. परीक्षा प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि सर्व नियमांचे पालन करून पार पडली आहे. अपूर्ण, दिशाभूल करणार्या किंवा अप्रमाणित माहितींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना केले. या वादाची सुरुवात काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली होती. बारावीच्या परीक्षेत सुमारे 35 ते 40 टक्के गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षेत 90 ते 99 टक्क्यांहून अधिक गुणांक कसा मिळाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी तसेच दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, राज्य सामाईक प्रवेश परीक्षेबाबतचे अनेक मुद्दे त्यांच्या निदर्शनास आले असून विविध स्तरांवर त्याबाबत चर्चा सुरू आहे. राज्यात यापूर्वी विविध भरती आणि प्रवेश परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. जर या परीक्षेतही कोणताही गैरप्रकार झाला असेल, तर ते अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्हिडिओत आर्थिक देवाण-घेवाणीतून मिळाले जास्त गूण
समाजमाध्यमांवर प्रसारित होत असलेल्य व्हिडिओमध्ये काही विद्यार्थ्यांना कथितरीत्या आर्थिक व्यवहारातून जास्त गुण मिळाल्याचा, गुणवत्ता यादीत अनियमितता झाल्याचा तसेच परीक्षा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या सर्व दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. राज्य सरकार किंवा परीक्षा प्राधिकरणानेही या आरोपांना दुजोरा दिलेला नसून, प्राधिकरणाने उलट सर्व आरोप फेटाळले आहेत.

COMMENTS