नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसून इंधनाच्या किमतीतही वाढ झालेली नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले आहे. अफवांम

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नसून इंधनाच्या किमतीतही वाढ झालेली नाही, असे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले आहे. अफवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी सरकारने आवाहन केले असून गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करू नये, असे पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा सांगितले आहे.
केंद्रातील पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल पंप तसेच त्यांना पुरवठा करणार्या साठवण केंद्रांवरही इंधन मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून कोणत्याही प्रकारची तूट निर्माण झालेली नाही. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिल्लीत झालेल्या आंतर-मंत्रालयीन बैठकीनंतर सांगितले की, गेल्या काही दिवसांत अफवांमुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी घाईघाईने इंधन खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचे दिसून आले. मात्र ही परिस्थिती कृत्रिम असून प्रत्यक्षात कोणतीही कमतरता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, देशाची कच्चे तेल प्रक्रिया करण्याची वार्षिक क्षमता सुमारे 26 कोटी टन इतकी आहे. त्यामुळे जागतिक घडामोडींचा तात्पुरता परिणाम झाला तरी देशांतर्गत गरज भागविण्याची क्षमता सक्षम आहे. पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी मार्गे होणार्या तेल आणि वायू वाहतुकीवर परिणाम झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या सुमारे अर्ध्या गरजेसाठी आणि वायू आयातीच्या मोठ्या भागासाठी या मार्गावर अवलंबून आहे. तरीही सरकारने पर्यायी व्यवस्था आणि साठ्याच्या आधारे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
गॅस पुरवठ्याबाबतही सरकारने दिलासा दिला आहे. घरगुती वापरासाठी लागणार्या द्रवरूप गॅसचा पुरेसा साठा वितरकांकडे उपलब्ध आहे. ऑनलाइन नोंदणी आणि वितरण प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर नव्या पाइप गॅस जोडण्या देण्यात आल्या असून अनेक ग्राहकांनी सिलिंडरऐवजी पाइप गॅसचा पर्याय स्वीकारला आहे. व्यावसायिक गॅसच्या बाबतीतही राज्यांना आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई सुरू आहे. अलीकडेच विविध राज्यांत छापे टाकून मोठ्या प्रमाणात सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. पर्यायी इंधन म्हणून केरोसिनचा अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अनेक राज्यांमध्ये त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना पर्याय उपलब्ध राहणार आहे.
भारतात इंधन पुरवठा सुरळीत
होर्मुझ सामुद्रधुनी हा पर्शियन आखात आणि अरबी समुद्र यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो. जगातील मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम वाहतूक याच मार्गाने होते. सध्या या भागातील अस्थिरतेमुळे जागतिक बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असली तरी भारतातील इंधन पुरवठा सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार सरकारने केला आहे. एकूणच, परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.

COMMENTS