मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत दिलासादायक घडामोड समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप

मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत दिलासादायक घडामोड समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून, त्यासाठी आवश्यक निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लाखो महिलांची प्रतीक्षा आता संपण्याच्या मार्गावर आहे.
महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट खात्यात जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता सामाजिक न्याय विभागाने सुमारे 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याने वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक पडताळणी आणि लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी ओळख व माहिती पडताळणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. अर्ज करताना झालेल्या चुका, चुकीची माहिती किंवा अपूर्ण तपशील यामुळे काही महिलांना अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने माहिती दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ही पडताळणी प्रक्रिया मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून सहज पूर्ण करता येते. तरीही अनेक महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत संबंधित महिलांचा हप्ता थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उर्वरित कालावधीत सर्व लाभार्थ्यांनी तातडीने आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पडताळणीनंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी
पडताळणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. आवश्यक अटी पूर्ण न करणार्या किंवा माहिती अद्ययावत न करणार्या महिलांना योजनेचा लाभ मिळणे थांबले आहे. त्यामुळे पात्र महिलांनी शासनाने दिलेल्या मुदतीचा लाभ घेत सर्व तपशील अचूकपणे नोंदवणे गरजेचे आहे. यामुळे केवळ फेब्रुवारीच नव्हे, तर पुढील महिन्यांचे हप्तेही कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे खात्यात जमा होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

COMMENTS