Homeताज्या बातम्या

पोलिस भरती प्रशिक्षणादरम्यान खदानीत बुडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; दोन प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबड : अंबड जवळील वलखेड येथील खदानीत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत 19 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला असून, या प्रकर

घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गुजरात-महाराष्ट्र महामार्गावर दोन बसेसचा भीषण अपघात, ७ प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी


अंबड : अंबड जवळील वलखेड येथील खदानीत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत 19 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू झाला असून, या प्रकरणात दोन प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्योदरी करिअर अकॅडमी येथे पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी गुरुवारी सकाळी धावण्याचा सराव करण्यासाठी भालगाव रोड परिसरात गेले होते. सराव पूर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी व विद्यार्थिनी वलखेड येथील खदानीत पोहण्यासाठी उतरले. या वेळी प्रीती अंशीराम भाकड (वय 19, रा. देव्हीगव्हाण खु.) हिला पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिच्यासोबत पोहत असलेल्या इतर दोन मुलींनी आरडाओरडा केला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य केले आणि दोन मुलींचे प्राण वाचवण्यात यश आले, मात्र प्रीतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट अंबड पोलीस ठाणे येथे नेला आणि प्रशिक्षणादरम्यान निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत संबंधित प्रशिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी फिर्यादीनुसार मत्स्योदरी करिअर अकॅडमीचे प्रशिक्षक गोकुळ बारवाल आणि गणेश वायसे (दोघे रा. अंबड) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 105/3/5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नरोटे करीत आहेत. या घटनेमुळे अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

COMMENTS