देवळाली प्रवरा : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकारणा

देवळाली प्रवरा : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विश्वास टाकून उमेदवारी दिलेल्या वाकचौरे यांच्या पुढील वाटचालीबाबत आता विविध तर्क-वितर्क रंगू लागले आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ‘लोखंडे पॅटर्न’ची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास अनेक वळणांनी भरलेला राहिला आहे. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश, तेथून निवडणूक लढविणे आणि नंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुनरागमन करून खासदारकी मिळविणे, हा त्यांचा प्रवास चर्चेचा विषय ठरला होता. अनेक शिवसैनिकांचा विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली आणि राज्यातील बदललेल्या राजकीय वातावरणात वाकचौरे विजयी झाले.
मात्र, खासदारकी मिळाल्यानंतर मतदारसंघातील प्रश्नांवर अपेक्षित आक्रमकता दिसून आली नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे. शिर्डीतील पक्षाच्या महत्त्वाच्या मेळाव्याला त्यांची अनुपस्थिती, तसेच मुंबईतील काही पक्षीय बैठकींकडे त्यांनी फिरवलेली पाठ, यामुळे चर्चांना अधिक उधाण आले आहे.
यापूर्वी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही शिवसेनेच्या माध्यमातून खासदारकी मिळविल्यानंतर वेगळी राजकीय वाट निवडली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता वाकचौरे यांच्या बाबतीतही तशाच चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगत आहे की, केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून मंत्रीपद किंवा कुटुंबातील सदस्याला आगामी विधानसभा निवडणुकीत संधी मिळण्याबाबत काही आश्वासने मिळाल्याने वाकचौरे नवीन राजकीय समीकरणांच्या शोधात आहेत. मात्र, या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत आधार नसून संबंधित पक्ष किंवा खासदारांकडूनही कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कठीण काळात ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्या नेतृत्वासोबत खासदार वाकचौरे राहणार की नवीन राजकीय वाट निवडणार, याकडे आता केवळ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचेच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचेही लक्ष लागले आहे. “राजकारणात चर्चांना ऊत आला असला तरी अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होईपर्यंत सर्व चर्चा या केवळ राजकीय वर्तुळातील अंदाज म्हणूनच पाहिल्या जात आहेत.”
विश्वास, विजय आणि आता चर्चा!
खा. वाकचौरे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणुकीत पराजय झाला. गेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पुनरागमन झाले. शिवसैनिकांचा विरोध असतानाही त्यांना उमेदवारी दिली गेली आणि ठाकरेंचा आदेश मानून शिवसैनिकांनी खा. वाकचौरे यांना लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दाखविला. मात्र, आता खा. वाकचौरे पक्षीय कार्यक्रमांपासून दूर असल्याची चर्चा असून संभाव्य नव्या राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्क केले जात आहेत. अधिकृत भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने खा. वाकचौरे तळ्यात की मळ्यात, हे समजण्यास वेळ लागणार आहे.

COMMENTS