नांदेड : नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे भलेमोठे फलक लावण्याची परंपरा काही कार्यकर्त्यांनी इतकी मनावर घेतली आहे की, आता महापालिकेचे जाहिर

नांदेड : नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे भलेमोठे फलक लावण्याची परंपरा काही कार्यकर्त्यांनी इतकी मनावर घेतली आहे की, आता महापालिकेचे जाहिरात शुल्क वाचवण्यासाठी त्यांनी नवीच रणनीती आखल्याची चर्चा शहरात रंगली आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत जाहिरात फलक लावण्यासाठी शुल्क भरावे लागते. मात्र, हे शुल्क टाळण्यासाठी काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी फलक थेट वाडी (बु.), छत्रपती चौक परिसर आणि लातूर फाटा या महापालिका हद्दीबाहेरील भागात लावल्याचे चित्र दिसत आहे.
शहरात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले शुभेच्छा फलक पाहून नेत्यांचा वाढदिवस आहे की फलक महोत्सव? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आहे. काही ठिकाणी तर फलकांची संख्या इतकी वाढली आहे की, रस्त्यावरील दिशादर्शक फलकही त्यांच्या आड लपल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा कार्यकर्त्यांचे फोटोच अधिक मोठे असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये रंगत आहे. नेते कोण आणि शुभेच्छा देणारे कोण? हे ओळखण्यासाठी फलकासमोर काही क्षण उभे राहावे लागते, अशी मिश्कील प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सामाजिक संदेश, पर्यावरण, स्वच्छता किंवा वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणारे फलक क्वचितच दिसतात. मात्र वाढदिवस, अभिनंदन आणि स्वागताच्या फलकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहराच्या विद्रूपीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी फलक लावताना संबंधित यंत्रणेची परवानगी घेणे, नियमांचे पालन करणे आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा नियमभंगाचीच अधिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

COMMENTS