अहिल्यानगर: सिस्पे घोटाळ्यातील हजारो पीडितांना न्याय मिळावा, फरार आरोपींना अटक व्हावी आणि या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जावा, यासाठी खासदार नीलेश
अहिल्यानगर: सिस्पे घोटाळ्यातील हजारो पीडितांना न्याय मिळावा, फरार आरोपींना अटक व्हावी आणि या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे जावा, यासाठी खासदार नीलेश लंके यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र व राज्यातील विविध तपास यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, सिस्पे घोटाळ्यातील फरार मुख्य आरोपींपैकी एक आणि कथित मास्टरमाइंड अकाउंटंट राहुल शामराव काळोखे याला इंटरपोलच्या माध्यमातून फिजी येथे अटक करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे अनेक वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पीडितांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या अटकेमुळे घोटाळ्याच्या तपासाला अधिक गती मिळण्याची तसेच या प्रकरणातील इतर आरोपींनाही कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस, पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर, सीबीआय (दिल्ली), भारत सरकारचे गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच इंटरपोल यांनी परस्पर समन्वयाने काम केले. विविध यंत्रणांमध्ये सातत्याने समन्वय घडवून आणण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधत या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
सिस्पे घोटाळ्यातील पीडितांनी अनेकदा खासदार लंके यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. त्याचा परिणाम म्हणून तपासाला गती मिळाली आणि आरोपीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध घेण्याची प्रक्रिया यशस्वी ठरली.
राहुल शामराव काळोखे याच्या अटकेनंतर त्याला भारतात आणण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर घोटाळ्यातील आर्थिक व्यवहार, निधीचा प्रवाह, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि इतर आरोपींबाबत अधिक सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे.
या कारवाईनंतर सिस्पे घोटाळ्यातील पीडितांनी समाधान व्यक्त करत खासदार नीलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत केले आहे. न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, घोटाळ्यातील प्रत्येक दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
खासदार नीलेश लंके यांनीही संबंधित सर्व तपास यंत्रणांचे आभार मानत, “सिस्पे घोटाळ्यातील प्रत्येक पीडिताला न्याय मिळेपर्यंत आणि या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे.

COMMENTS