श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून सुरक्षा यंत्रणांनी एका समन्वित कारवाईत पाच संशयितांना अटक केली आहे. यामध्

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून सुरक्षा यंत्रणांनी एका समन्वित कारवाईत पाच संशयितांना अटक केली आहे. यामध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असून उर्वरित तिघे त्यांच्या स्थानिक मदतनीस असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे सीमापार दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी अब्दुल्ला उर्फ अबू हुरेरा हा तब्बल 16 वर्षांपासून फरार होता. दुसरा आरोपी उस्मान उर्फ खुबैब असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. हे दोघेही लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणांनीही सहभाग घेतला. जम्मू-काश्मीरसह राजस्थान आणि हरियाणामधील तब्बल 19 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबवण्यात आली. या छाप्यांदरम्यान महत्त्वाचे पुरावे आणि साहित्य जप्त करण्यात आले असून, दहशतवादी नेटवर्कच्या आर्थिक व लॉजिस्टिक पुरवठ्याबाबत महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपासात असेही उघड झाले की, श्रीनगरमधील मोहम्मद नकीब भट, आदिल रशीद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा हे तिघे आरोपी दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर मदत पुरवत होते. हे तिघेही सीमापार हँडलर्सच्या संपर्कात होते, ज्यामुळे स्थानिक पातळीवर दहशतवादी कारवाया सुलभ होत होत्या. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी सुमारे 2010 च्या सुमारास भारतात घुसखोरी करून काश्मीर खोर्यात विविध भागात सक्रिय होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी जवळपास 40 दहशतवाद्यांच्या कारवायांचे नेतृत्व केले होते. यापैकी अनेक जणांना सुरक्षा दलांनी आधीच ठार केले आहे. दरम्यान, तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. या नेटवर्कशी संबंधित एक दहशतवादी बनावट कागदपत्रांच्या आधारे देशाबाहेर पळून जाण्यात यशस्वी झाल्याची माहिती मिळाली असून, त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. तसेच, सीमापार दहशतवादी नेटवर्क मोडीत काढण्यासाठी पुढील काळात आणखी कठोर कारवाया केल्या जाणार असल्याचेही संकेत मिळत आहेत.

COMMENTS