Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मंत्री लोढाच्या वक्तव्याने जैनसमाजात संताप; अल्पसंख्याक हक्कांवर ठाम; आमच्या अधिकारांवरील गदा अमान्य

मुंबई राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जैन समाजासंदर्भातील विधानामुळे राज्यात नवा वाद पेटला असून जैन समुदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू ला

३ महिन्यांनंतर कदाचित एलपीजी मिळणे बंद होईल : मंत्री छगन भुजबळ
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कुशावर्त येथे जलपूजन

मुंबई राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जैन समाजासंदर्भातील विधानामुळे राज्यात नवा वाद पेटला असून जैन समुदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जैन समाजाने आपला अल्पसंख्याक दर्जा सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन लोढा यांनी केल्यानंतर सामाजिक आणि धार्मिक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या वक्तव्यावर जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, जैन धर्म हा स्वतंत्र, प्राचीन आणि तत्त्वज्ञानाधिष्ठित धर्म असून त्याची ओळख वेगळी आहे. आम्ही भारतीय संस्कृतीशी जोडलेलो आहोत, मात्र जैन धर्माला कोणत्याही इतर धर्माची उपशाखा म्हणणे चुकीचे आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. गांधी यांनी पुढे सांगितले की, जैन समाजाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही सवलत नसून तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. हा दर्जा गमावणे म्हणजे स्वतःची ओळख नाकारणे ठरेल. अशा प्रकारच्या विचारांना आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. आमच्या अधिकारांवर गदा आणण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, या वादाची पार्श्‍वभूमी स्पष्ट करताना लोढा यांनी मांडलेले मतही चर्चेत आले आहे. त्यांच्या मते, जैन धर्म हा व्यापक हिंदू संस्कृतीचाच भाग असून इतिहासात विविध सत्तांनी समाजात फूट पाडण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळेच जैन समाजाची संख्या घटल्याचे त्यांनी सूचित केले. समाजातील ज्येष्ठ साधू-संत आणि विचारवंतांशी या विषयावर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोढा यांनी पुढे असेही संकेत दिले की, समाजात व्यापक सहमती निर्माण झाल्यास अल्पसंख्याक दर्जासंदर्भात कायदेशीर प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते. त्यांनी सांस्कृतिक एकात्मतेवर भर देत एकात्म भावनेने पुढे येण्याची वेळ आली आहे, असे मत व्यक्त केले. या पार्श्‍वभूमीवर राज्यात धार्मिक ओळख, घटनात्मक हक्क आणि सामाजिक समन्वय यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. जैन समाजाने मात्र आपली स्वतंत्र ओळख आणि अधिकार कायम ठेवण्याची भूमिका स्पष्ट केल्याने हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS