देवळाली प्रवरा : राहुरी कॉलेज हा अहिल्यानगर विभागाच्या एसटी बसेसचा अधिकृत बसथांबा असतानाही काही बसेस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व प्र

देवळाली प्रवरा : राहुरी कॉलेज हा अहिल्यानगर विभागाच्या एसटी बसेसचा अधिकृत बसथांबा असतानाही काही बसेस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. याशिवाय राहुरी बसस्थानकातून राहुरी कॉलेजकडे जाणाऱ्या प्रवाशांना काही वाहकांकडून बसमध्ये घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. राहुरी कॉलेज येथे संबंधित अधिकारी, महाविद्यालय प्रशासन व विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी एसटी सेवेबाबतच्या विविध अडचणी मांडल्या. अधिकृत बसथांबा असतानाही काही बसचालकांकडून बसेस न थांबविल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. राहुरी कॉलेज हा अधिकृत बसथांबा असल्याने अहिल्यानगर विभागाच्या बसेसनी येथे नियमित थांबणे अपेक्षित आहे. त्यामुळे अधिकृत थांबा असताना बस न थांबविण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बैठकीत घेण्यात आली. राहुरी कॉलेज येथे सर्व एसटी बसेसना नियमित थांबा देण्यात यावा, तसेच हा अधिकृत बसथांबा असल्याचा फलक तातडीने लावण्यात यावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अधिकृत बसथांबा असूनही बसेस न थांबविणाऱ्या चालक व वाहकांवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना सुरळीत व नियमित बससेवा मिळणे आवश्यक असून, त्यांच्या सोयीशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला. दरम्यान, या बैठकीनंतर एसटी प्रशासनाकडून प्रत्यक्षात कितपत कार्यवाही होते आणि राहुरी कॉलेज बसथांब्यावरील विद्यार्थ्यांची गैरसोय कितपत दूर होते, याकडे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS