गेवराई । प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांची बस पास काढण्यासाठी मोठी गर्दी होत असताना तलवाडा बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रकाच्या

गेवराई । प्रतिनिधी : शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांची बस पास काढण्यासाठी मोठी गर्दी होत असताना तलवाडा बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रकाच्या अनियमित उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. संबंधित कर्मचारी नियोजित वेळेत कार्यालयात हजर राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून गेवराई आगार प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तलवाडा बस स्थानकावरील वाहतूक नियंत्रकाची अधिकृत कामाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र प्रत्यक्षात संबंधित कर्मचारी सकाळी ११ वाजल्यानंतरच कार्यालयात येत असल्याची तसेच दुपारी ३ ते ३.३० वाजण्याच्या सुमारास कार्यालय सोडून निघून जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे कार्यालय अनेक तास बंद राहत असून बस पास, मार्गदर्शन व इतर कामांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पास मिळणे अत्यंत आवश्यक असताना कार्यालयातील या हलगर्जीपणाचा थेट परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना शाळेचा वेळ चुकवून बस स्थानकावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही विद्यार्थ्यांना पास नसल्यामुळे अतिरिक्त प्रवासखर्चही सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कामाच्या वेळेत गैरहजर राहूनही संबंधित कर्मचारी पूर्ण दिवसाचा पगार घेत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी वाढत आहे. या प्रकाराकडे गेवराई आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. मस्के यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे आगारातील शिस्त आणि नियंत्रण याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून संबंधित वाहतूक नियंत्रकावर कारवाई करावी, तसेच तलवाडा बस स्थानकावर जबाबदारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.

COMMENTS