माजलगाव येथील नवीन बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणार्या दोन आरोपींना माजलगाव शहर पोलिस

माजलगाव येथील नवीन बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरणार्या दोन आरोपींना माजलगाव शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत आरोपींकडून चोरीस गेलेली 34 हजार 790 रुपये किमतीची सोन्याची पोत हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे शहरात साखळी चोरी करणार्या टोळींवर पोलिसांनी प्रभावी कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखुबाई मुरलीधर गायकवाड (वय 70, रा. वाघोरा, ता. माजलगाव) या 15 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता माजलगावच्या नवीन बस स्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसस्थानकावर मोठी गर्दी असल्याचा फायदा घेत दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबवून तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पीडित महिलेने तत्काळ माजलगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माजलगाव शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळासह बसस्थानक परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलिसांनी आरोपींची ओळख निश्चित केली. तपासादरम्यान सारीका गोरक्ष शिंदे (वय 36, व्यवसाय मजुरी, रा. शंकरनगर, पाथर्डी, जि. अहमदनगर) आणि वैजीनाथ नामदेव गुंजाळ (वय 55, व्यवसाय मजुरी, रा. गांधीनगर, बीड) यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी 27 जुलै 2026 रोजी दोघांनाही अटक केली. अटकेनंतर आरोपींकडून चोरीस गेलेली 7 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (100 मणी व दोन डोरले) असा एकूण 34,790 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याने फिर्यादी महिलेला दिलासा मिळाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आनंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर, शिवाजी पवार, पोलीस हवालदार किशोर जाधव, गोविंद पाखरे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः बसस्थानके, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन माजलगाव शहर पोलिसांनी केले आहे.

COMMENTS