तिजन बाई : लोक गायनातील हिमालय !

Homeदखल

तिजन बाई : लोक गायनातील हिमालय !

            भारतीय लोककला परंपरेत काही कलाकार असे होऊन गेले की, ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण लोककलेचे स्थान

पंडित दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रतीक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महात्मा बसवेश्वर जयंती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी
कांद्याला केवळ १ रुपया भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त; ४ एकरातील ६०० पोती कांदा शेतातच पेटवून दिला

            भारतीय लोककला परंपरेत काही कलाकार असे होऊन गेले की, ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण लोककलेचे स्थान उंचावले. अशा महान लोककलावंतांमध्ये तिजन बाई यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाईल. त्यांनी छत्तीसगडमधील पारंपरिक पंडवानी या लोककलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. आपल्या प्रभावी आवाजाने, नाट्यमय अभिनयाने आणि भावपूर्ण कथनशैलीने त्यांनी महाभारतातील कथा जिवंत केल्या. त्यांचे जीवन हे संघर्ष, जिद्द, आत्मविश्वास आणि कलेप्रती अखंड निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण आहे.तिजन बाई यांचा जन्म गनियारी येथे १९५६ मध्ये एका आदिवासी कुटूंबात झाला. त्या सामाजिक आणि आर्थिक प्रतिकूल परिस्थितीत वाढल्या. लहानपणापासूनच त्यांना महाभारताच्या कथा ऐकण्याची आणि गाण्याची आवड होती. त्यांच्या आजोबा आणि गावातील लोककलावंतांकडून त्यांनी पंडवानीचे धडे घेतले. त्या काळात स्त्रियांना ही कला सादर करण्याची परवानगी नव्हती; परंतु त्यांनी सामाजिक विरोधाला न जुमानता आपल्या कलेचा सराव सुरू ठेवला. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. समाजाकडून विरोध, आर्थिक संकटे आणि कौटुंबिक अडचणी असूनही त्यांनी कलेची साथ सोडली नाही. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना स्थानिक कार्यक्रमांत संधी मिळू लागली. पुढे त्यांच्या विलक्षण प्रतिभेची दखल अनेक कलाप्रेमींनी घेतली आणि त्यांना देशभर कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.मध्य प्रदेशातील नाट्य क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व असणारे हबीब तन्वीर यांनी जेव्हा तिजन बाई यांचा कार्यक्रम ऐकला तेव्हा जोहरीने हिरा ओळखावा त्याप्रमाणेच त्यांनी तिजन बाई ची प्रतिभा ओळखली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घडवून दिली होती. इंदिरा गांधी यांच्या समोर सादरीकरण करण्यासाठी तिजन बाई यांना बोलवण्यात आले होते. कालांतराने त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. १९८० च्या दशकापासून, त्यांनी सांस्कृतिक राजदूत म्हणून इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, तुर्की, ट्युनिशिया, माल्टा, सायप्रस, रोमानिया आणि मॉरिशस यांसारख्या दूरवरच्या देशांमध्ये जगभर प्रवास केला. त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या पुस्तकावर आधारित श्याम बेनेगल यांच्या दूरदर्शनवरील गाजलेल्या ‘भारत एक खोज’ या मालिकेत महाभारतातील काही भाग सादर केले.त्यांच्या कलेचा गौरव म्हणून भारत सरकारने १९८८ मध्ये त्यांना पद्मश्री, २००३ मध्ये पद्मभूषण आणि २०१९ मध्ये पद्मविभूषण यांसारख्या प्रतिष्ठित नागरी सन्मानांनी गौरविले. दरम्यान १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार ही त्यांना मिळाला. त्यांच्या कार्यामुळे पंडवानी या लोककलाप्रकाराला जागतिक प्रतिष्ठा लाभली.पंडवानी ही छत्तीसगडची एक प्रसिद्ध लोककथा-गायन परंपरा आहे. या कलेत मुख्यतः महाभारतातील कथा गायन, संवाद, अभिनय आणि हावभाव यांच्या माध्यमातून सादर केल्या जातात. तिजन बाई यांनी या परंपरेला नवी ऊर्जा आणि नवे स्वरूप दिले. त्यांच्या गायनात ओजस्वीता आणि कोमलता त्याचबरोबर भावपूर्णता यांचा सुंदर संगम दिसून येतो. त्या केवळ कथा सांगत नाहीत, तर प्रत्येक पात्राचे भाव, स्वभाव, संघर्ष आणि मानसिक स्थिती आपल्या अभिनयातून प्रभावीपणे व्यक्त करीत. त्यामुळे प्रेक्षकांना जणू महाभारतातील प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे असल्याचा अनुभव येतो. त्यांच्या सादरीकरणात लोकभाषेचा सहज वापर, प्रभावी संवाद, योग्य लय-ताल आणि प्रसंगानुरूप आवाजातील चढ-उतार यामुळे कार्यक्रम अत्यंत आकर्षक बनतो. त्यांच्या हातातील तंबुरा हे केवळ वाद्य नसून अनेकदा तो कथानकातील विविध प्रतीकांचे रूप धारण करतो. कधी तो धनुष्य, कधी गदा, तर कधी तलवार असल्याचा भास निर्माण करून त्या अभिनय अधिक प्रभावी करतात.तिजन बाई यांच्या सादरीकरणात अनेक वैशिष्ट्ये आढळतात.दमदार आणि प्रभावी आवाज, उत्कट अभिनय आणि प्रभावी देहबोली, संवाद, गायन आणि कथन यांचा सुरेख मेळ, महाभारतातील पात्रांचे जिवंत चित्रण, लोकभाषेचा सहज आणि प्रभावी वापर करून कार्यक्रम अधिक प्रभावीपणे सादर केला जाई.त्यांच्या कार्यक्रमांमध्ये संगीत, अभिनय, कथा आणि लोकसंस्कृती यांचा सुंदर संगम दिसतो. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाचा प्रभाव सर्व वयोगटांतील प्रेक्षकांवर पडायचा. तिजन बाई यांनी स्त्रियांसाठी नवा आदर्श निर्माण केला. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या कलेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवून स्त्रीशक्तीचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या जीवनातून कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, हा प्रेरणादायी संदेश त्यांनी त्यांच्या जीवनातून दिला. तिजन बाई यांचे जीवन हे संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. कलेवरील निष्ठा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी जागतिक कीर्ती मिळवली. त्यांचे कार्य लोककलावंत, विद्यार्थी, संशोधक आणि सांस्कृतिक अभ्यासक यांच्यासाठी प्रेरणादायी ठरते. त्यांचे जीवन संघर्ष, जिद्द, आत्मविश्वास आणि कलेवरील अपार प्रेम यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम केवळ मनोरंजन करत नाहीत, तर भारतीय संस्कृती, परंपरा, नैतिक मूल्ये आणि लोककलांचा अमूल्य वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे तिजन बाई यांचे योगदान भारतीय सांस्कृतिक इतिहासात सदैव स्मरणात राहील. भारतीय लोक गायनात हिमालयाची उंची लाभलेल्या तिजन बाई यांना अखेरचा जोहार!

COMMENTS