Homeताज्या बातम्या

मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी मुख्य अभियंत्यासह तीन अधिकारी निलंबित!

पुणे: मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्यास सुर

‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींनी केले नागालँडच्या फुटबॉल उपक्रमाचे कौतुक; जागतिक योगासन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचाही गौरव
ऊसतोडा, पण पोरांच्या हातात शिक्षण द्या! वडवणीत ना. संजय राठोडांचा हुंकार; वनार्टीतून बंजारा समाजाचे भविष्य उजळवणार
मतपेटीपूर्वी पर्यटनाची मेजवानी; जिल्हा बँक निवडणुकीत मतदार ठरले ‘व्हीआयपी’
मोशी दुर्घटना : दोन अभियंते निलंबित

पुणे: मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अग्निशमन विभागातील अधिकारी ऋषिकेश चिपडे यांच्याविरुद्धही निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त प्रशासकीय इमारतीच्या मंजूर आराखड्याची आणि प्रत्यक्षात उभारण्यात आलेल्या बांधकामाची तुलना केल्यानंतर गंभीर विसंगती आढळून आली. अधिकृत परवानगी केवळ तळमजल्यापुरती असताना प्रत्यक्षात त्यावर आणखी दोन मजले उभारण्यात आले होते. ही बाब प्रत्यक्ष पाहणीदरम्यान लक्षात न आणता इमारतीला अंतिम अग्निमुक्ती दाखला (NOC) देण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासातून समोर आला आहे.

प्राथमिक चौकशीत इमारतीच्या सुरक्षेविषयीच्या नियमांचे काटेकोर पालन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच निष्काळजीपणामुळे इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील अधिकारी ऋषिकेश चिपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचे प्रशासनाचे मत असून, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. बांधकाम परवानगी विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, संबंधित क्षेत्र निरीक्षक, तसेच इमारतीचे ठेकेदार, वास्तुरचनाकार आणि तांत्रिक सल्लागार यांच्याविरुद्ध अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याने विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या प्रत्येक घटकाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या या भीषण दुर्घटनेनंतर शोध आणि बचावकार्य सलग ८४ तास सुरू होते. या दुर्घटनेत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विविध यंत्रणांनी संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केले होते.

COMMENTS