नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने केवळ राजकीय समीकरणांनाच वेग दिला नाही, तर मतदारांसाठी ती एकप्रकारची पर्यटनयात्राच ठरली

नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने केवळ राजकीय समीकरणांनाच वेग दिला नाही, तर मतदारांसाठी ती एकप्रकारची पर्यटनयात्राच ठरली. मतदानाच्या आधी विविध उमेदवारांनी मतदारांना धार्मिक व पर्यटनस्थळांच्या सहली घडवून आणल्याने निवडणूक प्रचाराची एक वेगळीच चर्चा जिल्हाभर रंगली आहे. त्यामुळे ‘मतदानापूर्वी पर्यटन आणि नंतर मतदान’ असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले.
जिल्हा बँकेच्या बहुतांश जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी भोकर विधानसभा मतदारसंघातील तीन ’अ’ वर्ग पतसंस्था मतदारसंघांत प्रत्यक्ष निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघांमध्ये प्रतिष्ठेची लढत निर्माण झाल्याने उमेदवारांनी मतदारांशी संपर्क वाढविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील भोकर, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांत काही तरुण उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. परिणामी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध धार्मिक आणि पर्यटनस्थळांच्या सहलींचे आयोजन करण्यात आले.
भोकर तालुक्यातील मतदारांनी शिर्डी, ओझर आणि आळंदी येथे दर्शन घेतले. अर्धापूरमधील मतदारांनी लोणावळा, खंडाळा, सातारा आणि गोवा या पर्यटनस्थळांचा आनंद लुटला, तर मुदखेड परिसरातील मतदारांना गुजरातमधील आनंद येथे सहलीची संधी मिळाली. काही दिवस या सहलींचा आनंद घेतल्यानंतर सर्व मतदार मतदानासाठी आपल्या गावी परतले.
दरम्यान, निवडणुकीतील राजकीय समीकरणेही तितकीच उत्सुकतेची ठरली आहेत. मुदखेडमध्ये प्रताप देशमुख, संदीप देशमुख आणि पिंटू वासरीकर यांनी माघार न घेतल्याने लढत कायम राहिली. अर्धापूरमध्ये बी.आर. कदम आणि ज्ञानेश्वर राजेगोरे, तर मुदखेडमध्ये मारोतराव जाधव आणि मारोतराव व्यवहार यांच्यात सामना होत आहे. भोकरमध्ये राजू दिवशीकर यांनीही माघार न घेतल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. विशेष म्हणजे, मुदखेडचे उमेदवार मारोतराव व्यवहार यांचा उमेदवारी अर्ज सुरुवातीला बाद झाला होता, मात्र विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यानंतर तो वैध ठरल्याने या मतदारसंघात निवडणूक रंगली.
विरोधी गटाची प्रचारयंत्रणा तुलनेने कमी सक्रिय असल्याची चर्चा असून, बचाव पॅनेलकडून मोठ्या प्रमाणात प्रचार झाल्याचे दिसून आले नाही. दुसरीकडे काही उमेदवारांनी घरपोच भेटी, वैयक्तिक संपर्क आणि मतदारांशी थेट संवादावर भर दिला. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत राजकीय डावपेचांइतकीच चर्चा मतदारांच्या पर्यटन सहलींची झाली. “निवडणुकीचा निकाल काहीही लागो, पण उमेदवारांच्या औदार्यामुळे अनेक धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे दर्शन घडले,” अशी मिश्किल प्रतिक्रिया अनेक मतदारांनी व्यक्त केली. त्यामुळे यंदाची जिल्हा बँकेची निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित न राहता, पर्यटन आणि राजकारण यांचा अनोखा संगम ठरल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे.

COMMENTS