मुंबई: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेशी (NEET) संबंधित पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभरात फेरपरीक्षा घेण्यात आली ह

मुंबई: वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेशी (NEET) संबंधित पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभरात फेरपरीक्षा घेण्यात आली होती. मात्र, या पुन्हा घेण्यात आलेल्या ‘फेरपरीक्षेचा’ही पेपर फुटल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी बुधवारी केला आहे. फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातधून बाहेर पडल्याचा दावा करत रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील आपल्या संदेशात म्हटले आहे की, मूळ प्रश्नपत्रिकेत गैरप्रकार झाल्यानंतर घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिकाही तीन दिवस आधीच बाहेर आल्याची माहिती विविध माध्यमांतून समोर येत आहे. हा दावा सत्य ठरल्यास ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अत्यंत गंभीर बाब ठरेल. त्यामुळे तपास यंत्रणांनी अजिबात विलंब न करता खरी वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि गैरप्रकार झाला असल्यास त्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणावी, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी रोहित पवार यांनी काही कागदपत्रे, पत्रव्यवहार, व्हॉट्सॲप मेसेजचे स्क्रीनशॉट्स व इतर पुरावे सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. या सर्व पुराव्यांची स्वतंत्रपणे कसून तपासणी करून खरी परिस्थिती जनतेसमोर आणावी, असेही त्यांनी नमूद केले.
देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरप्रकारामुळे आधीच विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा वेळी आता फेरपरीक्षेबाबतही संशय व्यक्त झाल्याने विद्यार्थ्यांमधील चिंता अधिक वाढली आहे. परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरू केली असून नव्या तरतुदींवर संसदेतही चर्चा सुरू आहे. दरम्यान, विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावर सरकारला चांगलेच घेरले जात आहे. फेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत झालेले हे आरोप कितपत सत्य आहेत, हे अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS