कोपरगाव : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय मानांकन मंडळ, नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्याल

कोपरगाव : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय मानांकन मंडळ, नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागांचे आंतरराष्ट्रीय निकषांनुसार मूल्यमापन करून तीन वर्षांसाठी मानांकन प्रदान केले आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील अशा प्रकारचे मानांकन मिळविणारे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय हे पहिले महाविद्यालय ठरले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले. यानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात अमित कोल्हे यांच्या हस्ते तसेच विजय नायडू यांच्या उपस्थितीत संबंधितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य आर. ए. कापगते, संस्थात्मक समन्वयक जी. विजयकुमार, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख ए. एस. सय्यद, यांत्रिक अभियांत्रिकी विभागप्रमुख पी. एम. पटारे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख एम. ए. जावळे यांच्यासह विविध विभागांचे समन्वयक व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानांकनासाठी सादर करण्यात आलेल्या अहवालात प्रवेशसंख्या, संशोधन पदवीधारक प्राध्यापक, विद्यार्थी-प्राध्यापक गुणोत्तर, विद्यार्थ्यांचा निकाल, उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, नामांकित उद्योगसंस्थांमधील रोजगार, संशोधन, कार्यशाळा, सल्लागार सेवा, सुसज्ज प्रयोगशाळा तसेच देश-विदेशातील संस्थांशी केलेले सामंजस्य करार यांचा समावेश होता. नवोदित अभियंत्यांना वार्षिक ३२ लाख रुपयांपर्यंत मिळालेल्या वेतनाच्या रोजगार संधींचीही मानांकन समितीने विशेष दखल घेतली.
अमित कोल्हे यांनी सांगितले की, देशातील सुमारे १ हजार २२२ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये संजीवनीची गणना पहिल्या २०० महाविद्यालयांत होते. महाराष्ट्रातील १२२ स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी केवळ २० महाविद्यालयांना हे मानांकन प्राप्त झाले आहे. भविष्यातही नवे उच्चांक प्रस्थापित करण्याचा संकल्प आहे.

COMMENTS