नेतृत्वाची खरी परीक्षा धमक्यांत नव्हे, तर संवादात 

Homeदखल

नेतृत्वाची खरी परीक्षा धमक्यांत नव्हे, तर संवादात 

          महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या काही वर्षांत अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. या प्रश्नाला सामाजिक न्याय, ऐ

कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संमतीपत्रासाठी कथित 500 वसुलीचा आरोप; चौकशीची मागणीखाजगी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितल्याचा दावा; आर्थिक फसवणुकीच्या संशयावरून दोषींवर कारवाईची आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सैनिक अशोक येडे यांची मागणी
केज नगरपंचायत घरकुल प्रकरणावरून चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; आंदोलनाचा इशारा
मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईलशेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा

          महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा गेल्या काही वर्षांत अत्यंत संवेदनशील विषय राहिला आहे. या प्रश्नाला सामाजिक न्याय, ऐतिहासिक अन्याय, राजकीय प्रतिनिधित्व आणि आर्थिक संधी या अनेक पैलूंची जोड आहे. या आंदोलनातून मनोज जरांगे पाटील हे राज्यव्यापी नेतृत्व म्हणून पुढे आले. त्यांनी अल्पावधीत मोठा जनसमर्थनाचा आधार निर्माण केला. परंतु कोणत्याही सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व केवळ जनसमर्थनावर टिकत नाही; ते संयम, दूरदृष्टी, संवादकौशल्य आणि लोकशाही मूल्यांवरील विश्वास यांवर टिकते. अलीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करू, अशी दिलेली राजकीय धमकी चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना परखड शब्दांत उत्तर दिले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुलनेने अधिक संयमी आणि समंजस भूमिका घेत संवादाचे दरवाजे खुले ठेवण्याचा प्रयत्न केला. या तीन प्रतिक्रिया महाराष्ट्रातील राजकारणात नेतृत्वाच्या तीन भिन्न शैली दाखवून देतात.सामाजिक चळवळीचा नेता आणि राजकीय पक्षाचा नेता यांच्यात मूलभूत फरक असतो. सामाजिक नेता एखाद्या प्रश्नावर जनमत तयार करतो; तर राजकीय नेता विविध हितसंबंधांचा समन्वय साधून निर्णयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाच्या जोरावर सरकारवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले. मात्र आंदोलनातून निर्माण झालेली नैतिक ताकद जर सतत राजकीय धमक्यांच्या भाषेत व्यक्त होऊ लागली, तर त्या नेतृत्वाचे नैतिक अधिष्ठान कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. आमच्या मागण्या मान्य नाहीत तर आम्ही निवडणुकीत पराभव करू, हा संदेश लोकशाही व्यवस्थेत राजकीय भूमिका म्हणून मांडला जाऊ शकतो. परंतु अशा विधानांची पुनरावृत्ती झाली की आंदोलनाचा केंद्रबिंदू प्रश्न न राहता व्यक्ती आणि सत्ता यांच्यातील संघर्ष बनतो. त्यामुळे मूळ प्रश्न मागे पडतो आणि संघर्षाचे राजकारण पुढे येते. प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्या विधानांना थेट प्रत्युत्तर दिले. लोकशाहीत कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीचा निकाल एकहाती ठरविण्याचा अधिकार नसतो, हा त्यांचा मूलभूत मुद्दा होता. निवडणुकीत अंतिम निर्णय मतदारांचा असतो. त्यामुळे कोणत्याही नेत्याने स्वतःला जनतेच्या निर्णयापेक्षा वर समजणे योग्य ठरत नाही. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक संयमित भूमिका घेतली. मतभेद असले तरी संवादातून मार्ग शोधण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एखाद्या आंदोलनाशी असहमती असली तरी संवादाचे पूल जाळू नयेत, हा त्यांच्या वक्तव्याचा गाभा होता. शासनप्रमुख म्हणून ही भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने अधिक संतुलित मानली जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाचा विचार करणे आवश्यक आहे. नेतृत्वाचा मोठेपणा समर्थकांची संख्या किती आहे यावर ठरत नाही; तर विरोधकांशी कसा संवाद साधला जातो, यावर ठरतो. मोठा नेता विरोधकांना शत्रू मानत नाही, तर लोकशाहीतील प्रतिस्पर्धी मानतो. मोठा नेता धमक्या देत नाही; तो आपल्या विचारांवर समाजाचा विश्वास निर्माण करतो.इतिहासात अनेक सामाजिक चळवळी यशस्वी झाल्या कारण त्यांच्या नेत्यांनी संघर्षाबरोबर संवादालाही तितकेच महत्त्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर भूमिका घेतली, परंतु घटनात्मक चौकट कधी सोडली नाही. महात्मा गांधींनी आंदोलन केले, पण संवादाची दारे बंद केली नाहीत. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी संघर्ष केला, पण राज्यकारभारातील संतुलनही राखले. या नेतृत्वांमध्ये संघर्ष आणि संवाद यांचा समन्वय होता. मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत मात्र अनेकदा व्यक्तिकेंद्री नेतृत्वाची छाप दिसून येते. आंदोलनाची दिशा संस्थात्मक होण्याऐवजी व्यक्तीभोवती केंद्रित होत गेली, तर चळवळीचे आयुष्य कमी होते. कारण व्यक्तीच्या प्रत्येक विधानाचा परिणाम संपूर्ण आंदोलनावर होतो. त्यामुळे नेतृत्वावर अधिक जबाबदारी येते.कोणत्याही सामाजिक आंदोलनाने राजकीय परिणाम घडवून आणणे चुकीचे नाही. परंतु आंदोलनाचा उद्देश विशिष्ट पक्षाचा पराभव हा नसून धोरणात्मक बदल घडवून आणणे असावा. अन्यथा समाजातील विविध घटकांमध्ये निर्माण झालेला विश्वास कमी होतो आणि आंदोलन एका राजकीय गटाशी जोडले गेल्याची प्रतिमा तयार होते. लोकशाहीत मतदारांना आवाहन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु पराभव करून दाखवू, अशा भाषेपेक्षा “शजनतेसमोर आमची भूमिका मांडू, ही भाषा अधिक प्रगल्भ मानली जाते. लोकशाहीची ताकद धमक्यांमध्ये नसून मतदारांच्या विवेकबुद्धीवर असलेल्या विश्वासात असते. महाराष्ट्राला संघर्षापेक्षा समन्वयाची, आरोप-प्रत्यारोपांपेक्षा संवादाची आणि भावनिक घोषणांपेक्षा धोरणात्मक उपायांची गरज आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जनाधाराचे रूपांतर अधिक व्यापक, समावेशक आणि संयमी नेतृत्वात केले, तर त्यांची राजकीय व सामाजिक उंची निश्चितच वाढू शकते. मात्र जर नेतृत्वाची भाषा सतत इशारे, धमक्या आणि संघर्ष याभोवतीच फिरत राहिली, तर त्यातून नेतृत्वाचा विस्तार न होता त्याच्या मर्यादाच अधिक स्पष्ट होतील.

COMMENTS