केज: नगरपंचायतमधील कथित 3 कोटी 65 लाख रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकर

केज: नगरपंचायतमधील कथित 3 कोटी 65 लाख रुपयांच्या घरकुल घोटाळा प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची सुरू असलेली चौकशी ही निष्पक्ष नसल्याचा आरोप करत दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
समितीचे लखन हजारे आणि अशोक गायकवाड यांनी तहसीलदार भंडारी यांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे की, चौकशी समितीकडून प्रत्यक्ष दोषींना वगळून केवळ काही घटकांवर कारवाईचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे खरे जबाबदार सुटत असून निरपराधांना लक्ष्य केले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या निवेदनात नमूद केल्यानुसार, घरकुल योजनेअंतर्गत विविध एजन्सींच्या नावाने मोठ्या प्रमाणावर रक्कम काढण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संबंधित एजन्सींवर फसवणुकीचा (कलम 420) गुन्हा दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या कथित घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकप्रतिनिधींची सखोल चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही समितीकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS