निसर्गाप्रती प्रेम दाखवा, प्रकृती तुम्हाला हजारो हातांनी मदत करते : अनुराधा पौडवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निसर्गाप्रती प्रेम दाखवा, प्रकृती तुम्हाला हजारो हातांनी मदत करते : अनुराधा पौडवाल

अहमदनगर : कुठेही गायनाचे शिक्षण घेतलेले नसताना केवळ थोरांचे आशीर्वाद आणि अध्यात्माचे, धार्मिकतेचे अनुष्ठान असल्याने मी गायिका झाले. हजारो गाणी गायली.

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार
BREAKING: सचिन वाझेंचे साथीदार एपीआय रियाज काझी यांना अटक!
राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ

अहमदनगर : कुठेही गायनाचे शिक्षण घेतलेले नसताना केवळ थोरांचे आशीर्वाद आणि अध्यात्माचे, धार्मिकतेचे अनुष्ठान असल्याने मी गायिका झाले. हजारो गाणी गायली. खूप गाणी लोकप्रिय झाली. कलाप्रांतात रमलेली असतानाच समाजासाठीही काम करण्याची उर्मी जागृत झाली. यातून मग शेतकरी आत्महत्येसारख्या संवेदनशील विषय मनाला खूप भिडला. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर काम करण्याचे ठरवले व सूर्योदय  फौंडेशनच्या मार्फत मराठवाड्यात जलसंधारणाची कामे सुरु केली. या कामांना मोठे यश मिळत असून याची एक चळवळ बनली आहे. हे काम करताना कधीही अडचण आली नाही. तुम्ही निसर्गाप्रती प्रेम दाखवा, प्रकृती तुम्हाला हजारो हातांनी मदत करते याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. पंचतत्त्वाची पूजा केल्याने हवे ते निश्चित मिळते असा विश्वास प्रसिध्द गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी व्यक्त केला.
जनजाती कल्याण आश्रम, संस्कार भारती,राष्ट्रहित संवर्धक मंडळ आणि भारत भारती नगर यांच्यातर्फे ग.म.मुळे स्मृती व्याख्यानमाला तपपूर्ती समारोहाचा समारोप माऊली सभागृहात अनुराधा पौंडवाल यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. गायकी ते पर्यावरण कार्यकर्ती असा प्रवास पौडवाल यांनी मुलाखतीतून उलगडून सांगितला.  प्रारंभी संस्कार भारतीच्या सदस्यांनी पर्यावरण विषयक गीते सादर केली. व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवसाच्या सोहळ्याचे उद्घाटन प्रमुख अतिथी प्राचार्य एम.एम.तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर अनुराधा पौडवाल, सूर्योदय फौंडेशनचे श्रीकांत चव्हाण, जनजाती कल्याण आश्रमचे विशारद पेटकर, संस्कार भारतीचे ऍड.दिपक शर्मा, भारत भारतीचे अशोक मवाळ, राष्ट्रहित संवर्धक मंडळाचे महेंद्र चंदे आदी उपस्थित होते.
आनंद कुलकर्णी व प्रसाद पुराणिक यांनी अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेत त्यांच्या गायिका ते पर्यावरण दूत या प्रवासाचा उलगडा केला. पौडवाल म्हणाल्या की, मी मूळची कर्नाटकची अलका नाडकर्णी, लग्नानंतर अनुराधा पौडवाल झाले. गाण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसले तरी माहेरी आईकडून सूरांचे संस्कार नक्कीच झाले होते. सासरी आल्यावर सासू तसेच सासर्‍यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच मी गायन क्षेत्रात योगदान देवू शकले. मला वाटते आई, वडील, सासू सासरे यांची सेवा करणे ही तुमचीगुंतवणूक  असते. त्यांचे आशीर्वाद आपल्याला कधीच काही कमी पडू देत नाही. गाणी गायला सुरु केल्यावर अनेक अनुभव आले. स्वत:ला सिध्द करता आले. असे असले तरी फिल्मी दुनियेच्या तथाकथित पार्टी, सेलिब्रेशनपासून मी लांबच राहिले. अध्यात्माची, धार्मिकतेची ओढ असल्याने असंख्य भक्तीगीते, स्तुतीगीते मी गायली. आद्य गुरु शंकराचार्य माझे श्रध्दास्थान आहे. आज प्रत्येक हिंदू घरात शंकराचार्य पोहोचणे आवश्यक आहे. मी मुंबई सारख्या मोठ्या शहरात वास्तव्यास असल्याने अनेकदा ग्रामीण भागातील समस्या शहरातील लोकापर्यंत पोहोचतच नाही, असे वाटते. मला जेव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय समजला तेव्हा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योगदान देण्याचा निर्धार केला. हे काम कसे करायचे हे मला काहीच माहिती नव्हते पण चांगले काम हाती घेतल्यावर चांगली व योग्य माणसे जोडली जातात, याचा अनुभव मला आला. श्रीकांत चव्हाण यांच्या माध्यमातून फौंडेशनचे  काम सुरु केले ते मातृतीर्थ माहूरच्या देवीपासून. तिथे पाण्याचा दुष्काळ संपवता आला. आज हा परिसर पाण्यामुळे समृध्द झाला आहे. नांदेड जिल्ह्यातच जवळपास दहा गावांत जलसंधारणाची कामे केली. दैवी चमत्कार म्हणा किंवा आणखी काय, पण अक्षरश: फक्त दगडं असलेल्या भागातही पाणी लागले. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात काम करून जलसंधारण चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. जेणेकरून हे विद्यार्थी आपापल्या गावांत अशी कामे करू शकतील. सेलिब्रिटी चेहरा असल्याने आपण केलेले काम चटकन लोकांना भावते हे लक्षात घेवून अनेकांना या कामासाठी प्रेरित करीत आहे. आता नगर जिल्ह्यातही मोहटादेवी देवस्थान ट्रस्टच्या सहकार्यातून जलसंधारणाचे काम करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यातही असेच काम केले तेव्हा विलक्षण अनुभव आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी याकामासाठी पाठ थोपटली तेव्हा खूप मोठी प्रेरणा मिळाली. मला वाटते निसर्गासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. खूप केले पाहिजे असे नाही. वृक्षारोपण, पाणी बचत याव्दारेही प्रत्येक जण पर्यावरणाच्या चळवळीत खारीचा वाटा उचलू शकतो.
विलास बडवे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.  व्याख्यानमालेच्या तपपूर्तीनिमित्त रवींद्र मुळे यांनी सर्व ज्ञात अज्ञात सहकार्‍यांचे, योगदान देणार्‍यांचे आभार व्यक्त केले. ऑनलाईन माध्यमातून ही व्याख्यानमाला देशभरात पोहोचल्याचा अभिमान व्यक्त करीत मुळे यांनी भविष्यातही हा उपक्रम आणखी व्यापक करण्याचे व विर्मश व्यासपीठाची उभारणी करण्याची घोषणी केली. यावेळी व्याख्यानमालेच्या तपपूर्तीत योगदान देणारे मेघश्याम बत्तीन, श्रीकांत आपटे, विद्याताई पटवर्धन, भावे काका, प्रशांत मोहोळे यांचा सन्मान करण्यात आला. ओंकार देऊळगावकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. अनुजा कुलकर्णी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या व्याख्यानास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

COMMENTS