Homeताज्या बातम्या

सहल संपली, आता जनतेची आठवण होणार का? १५ दिवसांच्या ‘राजकीय पर्यटनानंतर’ नगरसेवकांच्या घरवापसीकडे नांदेडकरांचे लक्ष

नांदेड : विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात रममाण झालेल्या नांदेड महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची अखेर ‘सहल’ संपत आली असून, आता त्यांना पु

थोरात कृषी महाविद्यालयात ‘खेती बचाव’ अभियान उत्साहात; शाश्वत शेती आणि जमीन सुपीकतेवर मार्गदर्शन
जमिनीच्या मोजणीसह विविध सेवांसाठी नागरिकांना मिळणार दिलासा
पिंपळनेर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

नांदेड : विधान परिषद निवडणुकीच्या राजकारणात रममाण झालेल्या नांदेड महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांची अखेर ‘सहल’ संपत आली असून, आता त्यांना पुन्हा एकदा जनतेच्या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील नागरिक दूषित पाणी, विस्कळीत वीजपुरवठा, साचलेले नाले आणि स्वच्छतेच्या समस्यांशी झुंज देत असताना त्यांचे लोकप्रतिनिधी मात्र आलिशान रिसॉर्ट, समुद्रकिनारे आणि राजकीय गणितांच्या बैठकीत व्यस्त असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना ‘सुरक्षित स्थळी’ हलविण्यात आल्याने महापालिकेतील राजकीय वर्दळच गायब झाली होती. नेहमी कार्यकर्ते, नागरिक आणि शिष्टमंडळांनी गजबजलेली महापालिका अक्षरशः ओस पडली होती. महापौरांपासून सभापतींपर्यंत आणि बहुतांश नगरसेवक सहलीवर गेल्याने महापालिकेत एक प्रकारचे ‘राजकीय लॉकडाऊन’च पाहायला मिळाले. मात्र, या शांततेची किंमत सामान्य नागरिकांना मोजावी लागली. देगलूर नाका, टायर बोर्ड परिसरासह अनेक भागांत नळाला नालीमिश्रित, दुर्गंधीयुक्त आणि गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या. विशेष म्हणजे महापौर कविता मुळे यांच्या प्रभागातही अशाच प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. “आमच्या नळातून गटाराचे पाणी येते आणि आमचे नगरसेवक समुद्रातील निळ्याशार पाण्याचा आनंद घेत आहेत,” अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी आपल्या नगरसेवकांना फोन करून समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता, “सध्या बाहेरगावी आहोत, आल्यावर पाहू,” अशी उत्तरे मिळाल्याचे सांगितले जात आहे.

या पंधरा दिवसांत महापालिकेत एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय कामकाज करत असल्याने महापालिकेत पुन्हा एकदा ‘प्रशासकराज’ आल्याची मिश्किल चर्चा रंगली. अनेक विभागांमध्ये केबीन ओस पडल्या होत्या, शिफारसीसाठी येणार्‍यांची गर्दी नव्हती आणि काही अधिकारीही निवांत दिसत होते. मात्र, दुसर्‍या बाजूला नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी उपलब्ध नसल्याने अनेकांना हेलपाटे मारावे लागले.

विशेष म्हणजे, राजकीय व्यासपीठावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे आणि सभागृहात शाब्दिक तलवारी उपसणारे नेते सहलीत मात्र एकाच बसमध्ये, एकाच रिसॉर्टमध्ये आणि एकाच भोजनाच्या टेबलावर दिसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकारणात कट्टर विरोधक असणारे अनेक चेहरे या सहलीत मात्र मैत्रीच्या वातावरणात दिसल्याने “राजकारण वेगळे आणि सहल वेगळी” अशी उपरोधिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली.

आता विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येत असल्याने नगरसेवकांची घरवापसी सुरू झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील राजकीय हालचाली पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र, या पुनरागमनानंतर नगरसेवकांसमोर शहरातील मूलभूत प्रश्नांचे मोठे आव्हान उभे आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर अनेक नाले अद्याप गाळाने भरलेले असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही भागात रस्त्यांवर पाणी साचत आहे, तर दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सहलीतील आठवणी बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींना शहरातील वीजपुरवठा, पाणीपुरवठा, नाल्यांची सफाई, स्वच्छता आणि रस्त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पंधरा दिवसांच्या या ‘राजकीय पर्यटनानंतर’ एक प्रश्न मात्र कायम आहे. निवडणुकीच्या वेळी मतदारांना शोधणारे लोकप्रतिनिधी, निवडून आल्यानंतर जनतेच्या दारात किती वेळा पोहोचतात? आणि आता सहल संपल्यानंतर खर्‍या अर्थाने जनतेची आठवण होणार का? नांदेडकरांचे लक्ष आता नगरसेवकांच्या स्वागताकडे नाही, तर त्यांच्या कामगिरीकडे लागले आहे. कारण नागरिकांना सहलींचे फोटो नकोत, तर स्वच्छ पाणी, नियमित वीज आणि स्वच्छ नाले हवे आहेत. जनतेची अपेक्षा साधी आहे; पण ती पूर्ण करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी ‘पर्यटन मोड’मधून बाहेर पडून पुन्हा ‘सेवा मोड’मध्ये…

COMMENTS