नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या काही नगरसेवकांच्या पदावर अपात्रतेची टांगती तलवा

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून विजयी झालेल्या काही नगरसेवकांच्या पदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागून जवळपास सहा महिने पूर्ण होत आले असतानाही अनेक सदस्यांनी अद्याप आपले मूळ जात वैधता प्रमाणपत्र महापालिका प्रशासनाकडे सादर केलेले नाही. विशेष म्हणजे, या नगरसेवकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह एमआयएम, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १६ जानेवारी रोजी पार पडली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५(ब) नुसार राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याने निकाल जाहीर झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत मूळ जात वैधता प्रमाणपत्र संबंधित प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे. ही मुदत संपण्यास आता अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित सदस्याची निवड थेट रद्द करण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात आहे.
या संदर्भात महापालिका प्रशासनाने संबंधित नगरसेवकांना लेखी स्वरूपात सूचना देत तातडीने प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील मिळून सुमारे दहा नगरसेवकांनी अद्याप कागदपत्रे दाखल न केल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाली, तर महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रमाणपत्रे वेळेत मिळविण्यासाठी आता नगरसेवकांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

COMMENTS